जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले गाऱ्हाणे
बेळगाव : गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकविण्यात आल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून वेळेत वेतन देण्याबरोबरच थकीत वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी एलअँडटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यापूर्वी महानगरपालिका आणि केयुआयडीएफसीकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 2021 पासून एलअँडटी कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी 30 हून अधिक कर्मचारी पार पाडत आहेत. मात्र, एलअँडटीकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत केले जात नाही. त्यातच आता पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांना पीएफ देण्यात येत होता. सदर पीएफही पाच महिन्यांपासून जमा करण्यात आलेला नाही, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांकडे विचारले असता ‘कामावर येऊ नका’ चे उत्तर
वेळेत पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ पगारावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ‘कामावर येऊ नका’ असे उत्तर दिले जात आहे. 30 हून अधिक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली असून याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून वेळेत पगार देण्यासह थकीत पगार देण्यात यावा, यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









