सनरायझर्स हैदराबाद पराभूत, ‘सामनावीर’ प्रेरक मंकडचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ हैदराबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या 58 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने यजमान सनरायझर्स हैदराबादचा 4 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी लखनौला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविताना 12 सामन्यातून 13 गुण नोंदविले आहेत. सनरायझर्स हैदराबाद 8 गुणासह शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.
शनिवारच्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने 20 षटकात 6 बाद 182 धावा जमवित लखनौला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. लखनौ सुपर जायंट्सने 19.2 षटकात 3 बाद 185 धावा जमवित विजय नोंदविला.

हैदराबाद संघाच्या डावामध्ये सलामीच्या अनमोलप्रीत सिंगने 27 चेंडूत 7 चौकारांसह 36, अभिषेक शर्माने 5 चेंडूत 1 चौकारासह 7, राहुल त्रिपाठीने 13 चेंडूत 4 चौकारांसह 20, कर्णधार मारक्रेमने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, हेन्रिच क्लासनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 47 तसेच अब्दुल समादने 25 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 37 धावा झळकविल्या. फिलिप्सला खाते उघडता आले नाही. हैदराबाद संघाने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 56 धावा जमविताना 2 गडी गमाविले. हैदराबादचे पहिले अर्धशतक 29 चेंडूत फलकावर लागले. त्यानंतर हैदराबादचे शतक 66 चेंडूत नोंदविले गेले. क्लासन आणि अब्दुल समाद या जोडीने सहाव्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 36 चेंडूत नोंदविली. अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. त्यानंतर क्लासन आणि अब्दुल समाद यांनी सहाव्या गड्यासाठी 58 धावांची भर घातल्याने हैदराबादला 182 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या डावात 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. लखनौ सुपर जायंट्सतर्फे कृणाल पांड्याने 2 तर आवेश खान, यश ठाकूर, अमित मिश्रा आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनौच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील चौथ्या षटकात सलामीचा मेयर्स फिलिप्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने केवळ 2 धावा जमविल्या. त्यानंतर डी कॉक आणि प्रेरक मंकड या जोडीने 30 चेंडूत 42 धावांची भागिदारी केली. लखनौ संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 1 गडी गमाविला होता. लखनौचे पहिले अर्धशतक 48 चेंडूत फलकावर लागले. त्यानंतर लखनौच्या 100 धावा 82 चेंडूत नोंदविल्या गेल्या. प्रेरक मंकडने आपले अर्धशतक 35 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह झळकविले. मंकड आणि स्टोईनिस यांनी तिसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागिदारी 35 चेंडूत केली. लखनौच्या 150 धावा 101 चेंडूत फलकावर लागल्या. डावातील नवव्या षटकामध्ये मार्कंडेने डी कॉकला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. डावातील 16 व्या षटकात स्टोईनिस अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 25 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 40 धावा जमविल्या. स्टोईनिस बाद झाला त्यावेळी लखनौला विजयासाठी 56 धावांची गरज होती. मंकडला पूरनकडून चांगली साथ मिळाली. पूरनने आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 13 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 44 धावा झोडपल्या. मंकडने 45 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 64 धावा झळकविल्या. या जोडीने आपल्या संघाला 4 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 58 धावांची भागिदारी केली. लखनौच्या डावात 10 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 6 धावा मिळाल्या. हैदराबाद संघातर्फे फिलिप्स, मार्कंडे, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकात 6 बाद 182 (अनमोलप्रीत सिंग 27 चेंडूत 36, अभिषेक शर्मा 7, राहुल त्रिपाठी 13 चेंडूत 20, मारक्रेम 20 चेंडूत 28, क्लासन 29 चेंडूत 47, समाद 25 चेंडूत नाबाद 37, अवांतर 5, कृणाल पांड्या 2-24, युधवीर सिंग 1-24, आवेश खान 1-30, यश ठाकूर 1-28, अमित मिश्रा 1-40).
लखनौ सुपर जायंट्स : 19.2 षटकात 3 बाद 185 (मेयर्स 2, डी कॉक 19 चेंडूत 29, प्रेरक मंकड 45 चेंडूत नाबाद 64, स्टोईनिस 25 चेंडूत 40, पूरन 13 चेंडूत नाबाद 44, अवांतर 6, फिलिप्स 1-10, मार्कंडे 1-39, अभिषेक शर्मा 1-42).









