आयपीएल 16 : राजस्थानने लखनौला 7 बाद 154 धावांवर रोखले, अश्विनचे दोन बळी, बोल्टचा भेदक मारा
वृत्तसंस्था/ जयपूर
11.3 षटकांत बिनबाद 87 अशी भक्कम स्थिती असूनही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना शेवटच्या 51 चेंडूत 68 धावा जमविता न आल्याने आयपीएलमधील साखळी सामन्यात लखनौ सुपरजायंट्सकडून 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 16 चेंडूत 21 धावा व 28 धावांत 2 बळी टिपणाऱ्या स्टोइनिसला सामनावीराचा बहुमान मिळाला.
चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करीत लखनौ सुपरजायंट्सला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 154 धावांवर रोखले होते. लखनौच्या काईल मेयर्सने अर्धशतकी खेळी करताना 51 धावा जमविल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल (35 चेंडूत 44) व जोस बटलर (41 चेंडूत 40) यांनी 87 धावांची भागीदारी करीत राजस्थानला भक्कम सुरुवात करून दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर लखनौच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांना अपेक्षित धावगती राखता आली नाही आणि त्यांना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 144 धावांवर रोखत लखनौने 10 धावांनी शानदार विजय साकार केला. स्ट्रोकप्लेसाठी आदर्श नसलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. राजस्थानच्या जैस्वाल, बटलर, पडिक्कल (21 चेंडूत 26) व रियान पराग (12 चेंडूत नाबाद 15) या चौघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. लखनौच्या आवेश खानने 25 धावांत 3 बळी मिळवले तर स्टोइनिसने 2 बळी टिपले. नवीन उल हकला एकही बळी मिळाला नाही, पण त्याने भेदक मारा करीत 4 षटकांत केवळ 19 धावा दिल्या.
लखनौचा हा चौथा विजय असून 8 गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. राजस्थानचा दुसरा पराभव असला तरी त्यांचे अग्रस्थान कायम आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 चौकार मारले तर राजस्थानने 4 व लखनौने 5 षटकार मारले.
मेयर्सचे अर्धशतक
राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर लखनौला प्रथम फलंदाजी दिली. फटकेबाजीस अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर काईल मेयर्सने सर्वाधिक 51 धावा जमविल्यानंतर मार्कस स्टोईनिस (16 चेंडूत 21) व निकोलस पूरन (20 चेंडूत 28) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे लखनौला दीडशेची मजल मारता आली. राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने उत्कृष्ट गोलंदाजी करीत 4 षटकांत केवळ 16 धावा देत एक बळी मिळविला तर रविचंद्रन अश्विननेही उत्तम मारा करीत 23 धावांत 2 बळी टिपले.
बोल्टने प्रारंभी दोन अप्रतिम षटके गोलंदाजी करीत कर्णधार सॅमसनचा प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय सार्थ ठरविला. त्याच्या गोलंदाजीपुढे लखनौचा कर्णधार झगडत होता. मोकळेपणाने फटकेबाजी करता न आल्याने त्याने संदीप शर्माला उत्तुंग फटका मारला. पण यशस्वी जैस्वालला त्याचा झेल टिपता आला नाही. यावेळी राहुल 6 धावांवर होता. आणखी सहा धावांची भर घातल्यानंतर जेसन होल्डरकडूनही त्याला जीवदान मिळाले. नंतर जैस्वालने त्याला धावचीत करण्याची संधीही वाया घालवली. मात्र त्याला या जीवदानांचा पुरेसा लाभ घेता आला नाही. होल्डरनेच त्याला बटलरकरवी 39 धावांवर झेलबाद केले. या धावांसाठी त्याला 32 चेंडू खेळावे लागले, त्यात 4 चौकार, 1 षटकाराचा समावेश आहे. नंतर बोल्टने आयुष बदोनीला एका धावेवर त्रिफळाचीत केले.
अनेक जीवदाने दिली असली तरी राजस्थानच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांत केवळ 37 धावा दिल्या. मेयर्सने मात्र अधूनमधून चौकार वसूल केले. त्याने चहलला चौकार व नंतर एक षटकार मारला तर राहुलनेही चहलला मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला. या षटकात एकूण 18 धावा त्यांना मिळाल्या. नंतर अश्विन, होल्डर यांनी मोजक्याच धावा देत लखनौच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. मेयर्सचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर अश्विनने त्याला त्रिफळाचीत केले. त्याने 42 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 51 धावा फटकावल्या. याशिवाय स्टोईनिसने 21 धावा फटकावताना 2 चौकार मारले तर पूरनने 29 धावा जमवताना 2 चौकार, एक षटकार मारला. चौघाव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. संदीप शर्मा, होल्डर यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 7 बाद 154 : केएल राहुल 39 (32 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मेयर्स 51 (42 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), स्टोइनिस 21 (16 चेंडूत 2 चौकार), पूरन 29 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 6. गोलंदाजी : अश्विन 2-23, बोल्ट 1-16, संदीप शर्मा 1-32, होल्डर 1-38, चहल 0-41.
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 144 : यशस्वी जैस्वाल 44 (35 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), बटलर 40 (41 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), सॅमसन 2, देवदत्त पडिक्कल 26 (21 चेंडूत 4 चौकार), हेटमायर 2, पराग नाबाद 15 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अश्विन नाबाद 3, अवांतर 12. गोलंदाजी : आवेश खान 3-25, स्टोइनिस 2-28, नवीन उल हक 0-19.