सिकंदर रझाचे अर्धशतक, राहूलचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिकंदर रझाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग संघाने लखनौ जायंट्सचा तीन चेंडू बाकी ठेवून दोन गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील पंजाब संघाचा पाच सामन्यातील हा तिसरा विजय आहे. लखनौ संघाने 5 पैकी तीन सामने यापूर्वीच जिंकले आहेत.
कर्णधार केएल राहूलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले. लखनौने 20 षटकात 8 बाद 159 धावा जमविल्या. राहूलने 74 धावा झळकाविल्या. पंजाबच्या सॅम करनने 31 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब किंग्ज संघाने 19.3 षटकात 8 बाद 161 धावा जमवल्या. शाहरुख खानने विजयी चौकार ठोकला.

पंजाब किंग्ज संघाने आपल्या डावात पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीचा फलंदाज तायडे गमावला. युधवीर सिंगने त्याला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर युधवीर सिंगने लखनौला आणखी एक धक्का देताना प्रभसिमरन सिंगचा 4 धावावर त्रिफळा उडवला. शॉर्ट आणि हरप्रित सिंग यांनी तिसऱ्या गड्यासाठी 28 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये पंजाब किंग्ज संघाने 45 धावात 3 गडी गमवले. गौतमने शॉर्टला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 34 धावा जमवल्या. हरप्रित सिंग आणखी सिकंदर रझा या जोडीने संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 30 धावांची भर घातली. 11 षटकात पंजाब संघाने 4 बाद 175 धावा जमवल्या होत्या. कृणाल पांड्याने हरप्रित सिंगला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमवल्या.

लखनौ संघातील बिस्नॉईने कर्णधार सॅम करनला 6 धावावर बाद केले. सिकंदर रझाने 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. बिस्नॉईने त्याला स्टोईनिस करवी झेलबाद केले. रझाने 41 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 57 धावा जमवल्या. तत्पुर्वी जितेश शर्मा वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. वूडने हरप्रित ब्रारला 6 धावावर झेलबाद केले. पंजाब संघाची यावेळी स्थिती 18.5 षटकात 8 बाद 153 अशी होती. पंजाबला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी 20 धावांची जरुरी होती. वूडने डावातील 19 वे षटक टाकताना 13 धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज होती. 20 वे षटक रवि बिस्नॉईने टाकले. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर शाहरुख खानने आणखी दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर शाहरुखने विजयी चौकार ठोकून आपल्या संघाला तीन चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला. शाहरुख खानने 10 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 23 धावा जमवल्या. 19.3 षटकात पंजाब संघाने 8 बाद 161 धावा केल्या. त्यांच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. लखनौतर्फे युधवीर सिंग, मार्क वूड आणि रवी बिस्नॉई यांनी प्रत्येकी दोन तर के. गौतम आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पुर्वी या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार केएल राहूल आणि मेयर्स या सलामीच्या जोडीने 7.4 षटकात 53 धावांची भागीदारी करत डावाला दमदार प्रारंभ केला. ही जोडी फुटल्यानंतर लखनौचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. फक्त त्याला राहूलचा अपवाद म्हणावा लागेल. मेयर्सने 23 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. ब्रारने त्याला झेलबाद केले. सिकंदर रझाने दिपक हुडाला 2 धावावर पायचीत केले. कृणाल पांड्या आणि राहूल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली. रबाडाने कृणाल पांड्याला शाहरुख खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर रबाडाने आपल्या याच षटकातील पुढील चेंडूवर पूरनला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. पांड्याने 17 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. राहूलला स्टोईनिसकडून बऱ्यापैकी साथ लाभली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 31 धावांची भागीदारी केली. स्टोईनिसने 11 चेंडूत 2 षटकारासह 15 धावा जमविल्या. करनने त्याला झेलबाद केले. केएल राहूल अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 56 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 74 धावा झळकाविल्या. तो सहाव्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. सॅम करनने आपल्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर के. गौतमला तर चौथ्या चेंडूवर युधवीर सिंगला बाद करत तो हॅट्ट्रीकच्या प्रतिक्षेत होता. पण बदोनीने पुढील चेंडू खेळून काढत करनला हॅट्ट्रीकपासून रोखले. बिन्सॉईने नाबाद 3 तर बदोनीने नाबाद 5 धावा केल्या. लखनौच्या डावात 12 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 6 वाईड आणि 1 नोबॉलचा समावेश आहे. लखनौने 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या. लखनौच्या डावात 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे करनने 31 धावात 3, रबाडाने 34 धावात 2 तर अर्शदीप सिंग, सिकंदर रझा व हरप्रित ब्रार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लखनौने पॉवर प्ले दरम्यान 49 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक – लखनौ सुपर जायंटस् : 20 षटकात 8 बाद 159 (केएल राहूल 74, मेयर्स 29, हुडा 2, कृणाल पांड्या 18, स्टोईनिस 15, बदोनी नाबाद 5, बिस्नॉई नाबाद 3, अवांतर 12, सॅम करन 3-31, रबाडा 2-34, अर्शदीप सिंग 1-22, ब्रार 1-10, सिकंदर रझा 1-19).
पंजाब किंग्ज 19.3 षटकात 8 बाद 161 (सिकंदर रझा 57, शाहरुख खान नाबाद 23, हरप्रित सिंग 22, मॅथ्यू शॉर्ट 34, जितेश शर्मा 2, हरप्रित ब्रार 6, रबाडा नाबाद 0, अवांतर 7, युधवीर सिंग 2-19, मार्क वूड 2-35, बिस्नॉई 2-18, के. गौतम 1-31, कृणाल पांड्या 1-32).








