नागरी पुरवठा खात्याची पर्रा साळगांव येथे कारवाई : घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा मोठा साठा जप्त
प्रतिनिधी/ फोंडा
घरगुती व व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलींडरमधील गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्या आणखी एका रॅकेटचा नागरी पुरवठा खात्याने पर्दाफाश केला आहे. पर्रा साळगांव येथे एका शेतीच्या आडोशाला बेकायदेशिररित्या साठविण्यात आलेले साधारण 164 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून या काळ्याबाजारात गुंतलेल्या काही राजस्थानी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास नागरी पुरवठा आणि वजनमाप खात्याच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. गेल्या काही महिन्यांत नागरी पुरवठा खात्याने केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.
साळगाव येथे टाकलेल्या या छाप्यात कमी वजनाचे, भरलेले आणि रिकामे असे व्यावसायिक व घरगुती वापरातील एलपीजी सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या बेकायदेशीर सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या काळ्याबाजारात गुंतलेले मुख्य सूत्रधार राधेश्याम, विकास स्वऊप, रमेश कुमार यांच्यासह त्यांना साहाय्य करणारे प्रदीपकुमार व रामस्वऊप या पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविऊद्ध हणजूण पोलिसस्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक चौकशी सुऊ आहे.
कमी वजनाचे, भरलेले, रिकामे 164 सिलिंडर जप्त
सीलबंद गॅस सिलिंडरमधील द्रव्य चोरुन रिकाम्या सिलिंडरमध्ये भरुन त्याचा काळाबजार चालल्याचा हा एकंदरीत गैरप्रकार आहे. हे गॅस सिलिंडर वडापाव, रसआम्लेट सारख्या गाड्यांबरोबरच भंगार अ•dयांमध्ये लोखंड व पत्रे वितळण्यासाठी दुप्पट दराने विकले जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. राज्यात चालणारा एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्याची सखोल चौकशी होणार आहे. तसेच ग्राहकांना सिलिंडर वितरित करताना संबंधित पुरवठादारांनी वजनाची खात्री कऊनच ते वितरित करण्याचे आदेश संबंधीत खात्याला देण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी दिली. पर्रा साळगांव येथील एका शेत जमिनीत उभारण्यात आलेल्या शेडमध्ये या बेकायदेशीर एलपीजी सिलिंडरचा साठा केला जायचा. भरलेल्या सिलिंडरमधील द्रव रिकाम्या सिलिंडरमध्ये खाली कऊन कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विकले जात असल्याचा हा एकंदरीत प्रकार आहे. त्यात गुंतलेले सर्वजण मूळ राजस्थानी असून त्यांच्याकडून जीए 03 व्ही 7704, जीए 03 व्ही 6727 आणि जीए 03 एएच 3530 या क्रमांकाची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सविस्तर तपासानंतर हे सिलिंडर नेमेके कुठे वितरित केले जायचे व हा काळाबाजार कधीपासून सुरू होता हे स्पष्ट होणार आहे. हणजूण पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. कारवाई केलेल्या पथकामध्ये नागरी पुरवठा खात्याच्या साहाय्यक संचालिका दीपा फुलारी, निरीक्षक राजीव सावंत, उपनिरीक्षक सर्वेश तुयेंकर, वासुदेव शिरोडकर, विश्वनाथ हळदणकर, रोहीत तळर्णकर तसेच वजनमाप खात्याचे निरीक्षक सिद्धेश शिरगावकर यांचा समावेश होता.
मडगाव, साकवाळनंतर आता साळगांवात
दरम्यान नागरी पुरवठा खात्यातर्फे गेल्या काही महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करणारी ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी मडगाव व सांकवाळ येथील कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात कमी वजनाचे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले होते. साकवाळ येथील कारवाईत कादेश गॅस सर्व्हिसेस या एजन्सीची 6 आणि अन्य एक मिळून 7 गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली होती. या कारवाईत भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या 1023 गॅस सिलिंडरपैकी तब्बल 283 एलपीजी गॅस सिलिंडर कमी वजनाचे आढळून आले होते.
ग्राहकांची फसवणूक खपवून घेणार नाही : मंत्री रवी नाईक
ग्राहकांना पुरवठा होणाऱ्या एलपीजी सिलिंडरचा राज्यात चाललेला काळाबाजार हा गंभीर प्रकार आहे. नागरी पुरवठा खात्याने गेल्या काही महिन्यांत तीन ठिकाणी छापे टाकून हे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. या काळ्याबाजारात गुंतलेल्यांवर योग्य ती कारवाई होणार आहे. मात्र यापुढे ग्राहकांनाही सिलिंडर विकत घेताना त्याच्या वजनाची पूर्ण खात्री कऊन घ्यावी लागेल. गेल्या महिन्यात साकवाळ येथे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या कमी वजनांच्या सिलिंडरवरील कारवाईनंतर वजनमापासंबंधी काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा आदेश संबंधीताना देण्यात आला आहे. पुरवठादार एजन्सीनीही ग्राहकांना गोदामातून किंवा घरपोच सिलिंडर देताना वजनकाटा ठेवणे आवश्यक आहे. सण उत्सवाच्या काळात जादा सिलिंडरची गरज भासत असल्याने अशा गैरप्रकारांना रान मोकळे मिळते. या गैरधंद्यांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणामार्फत आमचे प्रयत्न सुऊच राहतील. मात्र ग्राहकांनाही सतर्क राहावे लागेल. सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही, असे नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी सांगितले.









