इस्कॉनचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी यांचे
प्रतिनिधी / बेळगाव
विश्वास हा सर्वाधिक महत्वाचा आहे. ईश्वरावरती आपली निष्ठा आणि विश्वास हवा. तसाच तो जनमानसांवरही हवा. अत्यंत कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये ईश्वराची आराधना, प्रार्थना आपल्याला मार्ग दाखवू शकते. फक्त आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे, असे विचार इस्कॉनचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे 15 ते 30 वयोगटातील तरुणी आणि महिलांसाठी शनिवारी इस्कॉन मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘व्हंडर्स ऑफ सेफ’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, आपला जर ईश्वरावर विश्वास असेल तर आपल्याला त्या मूर्तीमध्ये चैतन्य दिसून येईल. अन्यथा ती मूर्ती म्हणजे एक दगडी पुतळा म्हणूनही पाहता येईल. गुलाबाचे चित्र छान असू शकते. परंतु प्रत्यक्ष गुलाबाला असणारा सुगंध त्या चित्रातील गुलाबाला असणार नाही. त्या प्रमाणेच या जगाचा निर्माता ईश्वर आहे. आणि त्याचे अस्तित्व आपल्याला आपण किती त्याची भक्ती करतो या निकषावर जाणवत राहते.
या पृथ्वीतलावर अनेक साधने किंवा लोक आहेत. परंतु ते सतत आपले संरक्षण करतील, असे नाही. त्यामुळे या पृथ्वीचा निर्माता म्हणजेच ईश्वर आपल्याला संरक्षण देत असतो. त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. ज्ञान हा खरा आत्मा आहे. आणि भगवत गीतेमध्ये ज्ञानालाच महत्व दिले गेले आहे. अत्यंत आणीबाणीच्या कठीण परिस्थितीत सुध्दा आपला ईश्वरावरील विश्वास ढळता कामा नये. तरच आपण खरे श्रध्दावान असे म्हणायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे आपण ज्याच्यावर विश्वास ठेवणार ती व्यक्ती या विश्वासाला पात्र आहे का? हे आपण सतत तपासून घ्यायला हवे. एका साध्या बीमधून मोठा वटवृक्ष निर्माण होवू शकतो. हा चमत्कार लक्षात घेतल्यास विश्वासामुळे अनेक चमत्कार घडू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे, असे सांगून अनेक बोध कथांमधून भक्तीरसामृत स्वामी यांनी निष्ठा, विश्वास आणि भक्ती याचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला तरुणी आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली. काही निमंत्रीत पाहुण्यांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती.









