अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, संस्कृतीचा एक भाग म्हणून आपल्याला मिळालेल्यातला काही भाग इतरांना अर्पण करून उरलेला भाग आपण केलेल्या कर्तव्यरुपी यज्ञाचा प्रसाद म्हणून भक्षण करावा पण सगळ्यांनाच हे पटतं असं नाही. त्यामुळे सर्व अन्न ते स्वत:च खातात ते जणू काही अन्नाच्याऐवजी पापच भक्षण करत असतात. जो इतरांचा वाटा त्यांना न देता स्वत:च खात असेल तो चोर समजावा. आपण सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरे आहोत. साहजिकच त्यांना आपल्या सर्वांची काळजी असते. म्हणून ईश्वराने माणसाच्या उपजीविकेसाठी अन्नसाखळी तयार केली असून त्यातून त्याने निर्माण केलेल्या जीवसृष्टीची पोटापाण्याची सोय केलेली आहे. हे चक्र अव्याहतपणे असंच चालू राहण्यासाठी मनुष्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं आवश्यक आहे असा निष्कर्ष त्यातून निघतो. मनुष्य जे जे कर्तव्य करतो ते मीच त्याला नेमून दिलेले असल्याने त्या प्रत्येक कर्तव्यकर्मात मी आहे हे लक्षात ठेव. पण हे लक्षात न घेता करत असलेलं काम ही आपली जबाबदारी आहे असं मनुष्य समजत असतो आणि त्यातील यशाने हुरळून जातो किंवा अपयशाने खचून जातो. हे योग्य नाही. त्यामुळे तो संसारचक्रात पुन:पुन्हा गुंतत जातो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो.
पुढील श्लोकात बाप्पा ज्ञानी व्यक्तीने हे संसाराचे महाचक्र भेदून टाकावं अशी अपेक्षा व्यक्त करतात.
संसृतीनां महाचक्रं क्रामितव्यं विचक्षणै ।
स मुदा प्रीणते भूपेन्द्रियक्रीडो धमो जन ।।16।।
अर्थ- ज्ञानी पुरुषाने संसाराचे महाचक्र आक्रमण करून जावे. हे राजा, जो अधम आहे तो इंद्रियांच्या क्रीडांमुळे मिळणाऱ्या आनंदात संतुष्ट होतो.
विवरण-ईश्वराने निर्माण केलेल्या संसाराच्या महाचक्रात मनुष्य फिरतो आहे. त्याची चित्रविचित्र वर्तणूक त्याला जन्ममृत्यूचे अनेक फेरे घ्यायला लावते. म्हणून बाप्पा सांगतायत की, माणसाने कर्तव्यपालन करून स्वस्थ रहावं. कर्तव्यपालन करून स्वस्थ राहिला की, तो परमपदी पोहोचतो हे बाप्पांनी आधीच्या श्लोकात सांगितलं आहेच. हे ज्यानं समजून घेतलंय त्याला बाप्पा ज्ञानी म्हणतात. जे ज्ञानी आहेत त्यांनी संसाराच्या महाचक्रावर आक्रमण करून ते भेदून टाकावं. ह्यात मुख्य अडथळा इंद्रियांचा असतो. माणसाला नाना प्रकारच्या इच्छा होत असतात. त्या जाणून घेऊन त्यांची ज्ञानेंद्रिये त्या इच्छा पूर्ण होण्याच्यादृष्टीने त्या कशा आणि कुठे पूर्ण होतील ह्याची माहिती पुरवतात. त्या माहितीचा उपयोग करून मनुष्य विषयांचे उपभोग घेत असतो.
विषयोपभोग ही अशी वस्तू आहे की, जिचा एकदा आनंद घेतला की माणसाची तृप्ती न होता ते आणखीन मिळावेत अशी आसक्ती त्याला वाटू लागते. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. ह्या सगळ्यातून तो अध:पतीत होऊन आणखीन खालच्या योनीत जन्म घेत असतो. चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरून आल्यावर मनुष्यजन्म मिळतो. आपले भले कशात आहे हे समजण्याची कुवत फक्त माणसात असते. इतर योनीतील प्राण्यांना जसे जीवन वाट्याला येईल तसे जगायचे असते पण माणसाला प्रारब्धानुसार जी परिस्थिती वाट्याला येईल त्या प्रत्येक प्रसंगी कसे वागायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देवाने दिले आहे.
कोणत्या प्रसंगी काय करणे उचित आहे हे ठरवून ते त्याने निरपेक्षतेने करावे आणि कर्मयोगाचे आचरण करून स्वत:चा उद्धार करून घ्यावा अशी बाप्पांची अपेक्षा आहे. असा हा अत्यंत दुर्मिळ मनुष्यजन्म जो विषयोपभोगात वाया घालवतो त्याच्या वर्तनाची शिसारी येऊन बाप्पा म्हणतात, जो, विषयोपभोगातून मिळणाऱ्या आनंदात रममाण होईल तो अधम म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य समजावा.
क्रमश:








