सप्टेंबरमध्ये लिव्हरपूल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या स्टार महिला बॉक्सर निखत झरीन व लवलिना बोर्गोहेन यांना वर्ल्ड चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा लिव्हरपूल येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताने एकूण 20 सदस्यीय संघ निवडला असून पतियाळातील एनआयएस येथे आठवडाभर खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. 4 ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ही वर्ल्ड बॉक्सिंग या नव्या नावाखाली होणारी पहिलीच स्पर्धा असेल. पुरुष व महिला विभागात एकूण दहा विविध वजन गटात या स्पर्धेतील लढती होतील. पुरुष व महिला बॉक्सर ऑलिम्पिक स्टाईलच्या बॉक्सिंगमध्ये प्रथमच ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन’ या किताबासाठी लढताना दिसणार आहेत.
गेल्या मार्चमध्ये झालेली राष्ट्रीय निवड चाचणी लवलिना व झरीन यांना हुकला होता. झरीन त्यावेळी जखमी झाली होती तर बोर्गोहेनला आसाम राज्य फेडरेशनमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्यामुळे तिला स्पर्धेसाठी पाठविण्यास नकार दिला होता. याच महिन्यात हैदराबादमध्ये झालेल्या इलाईट महिला बॉक्सिंग स्पर्धेत या दोघींनी पुनरागमन केले होते. पण अलीकडेच अस्ताना येथे झालेली वर्ल्ड कप स्पर्धाही त्यांना हुकली होती.
वर्ल्ड चॅम्पियनशिप बॉक्सिंगसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ : महिला-मीनाक्षी हुडा, निखत झरीन, साक्षी, जस्मिन लंबोरिया, संजू खत्री, नीरज फोगट, सनामाचा चानू, लवलिना बोर्गोहेन, पूजा राणी, नुपूर शेरॉन. पुरुष : जादुमनी सिंग मन्डेन्गबम, पवन बार्टवाल, सचिन सिवाच ज्युनियर, अभिनाश जमवाल, हितेश गुलिया, सुमित कुंडू, लक्ष्य चहर, जुगनू अहलावत, हर्ष चौधरी, नरेंदर बेरवाल.









