लाडकी बाहुली
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधुनि दुसऱ्या लाख
प्रथितयश इंदिरा संत यांच्या लेखणीतून उतरलेली ही कविता प्रत्येक मुलीच्या लहानपणी बाहुली होऊन तिच्या हातात वसत असते. एखादी मुलगी जर खूप नाजूक आणि सुंदर असेल, तर ती अगदी बाहुलीसारखी आहे हो! असे उद्गार तिला पाहणाऱ्या स्त्रिया सहज काढतात. बाहुली म्हणजे सुंदर, बाहुली म्हणजे नाजूक, बाहुली म्हणजे मुलीने कसं असावं याचे मापदंड लहानपणीच तिला समजावून सांगणारं प्रतीक जणू. बाहुलीच्या सोबतच तिच्या हातात हात घालून येते ती भातुकली. ती छोटी छोटी चूलबोळकी (म्हणजे आता गॅस, सिलिंडर वगैरे!) स्वयंपाकघरातली सगळी सगळी भांडी तो खोटा खोटा स्वयंपाक, आईची जुनी साडी वापरून केलेलं घर किंवा ताईची ओढणी वापरून केलेली साडी आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाहुलीचं लग्न.
लगीन करायचं बाहुलीचं
कुणीतरी नवरा शोधाल का?
या गाण्यात मग एक वरमाय येऊन म्हणते
माझा बाहुला आहे डॉक्टर
तो तिला बघ बाई शोभेल का?
तो वधुमाईला पसंत पडत नाही. मग येतो इंजिनिअर! तोही या बाहुलीच्या आईला नकोच असतो. शेवटी तिला पसंत पडतो तो राजा! ‘माझी सोनुली होईल राणी’ म्हणत मग त्या बाहुलाबाहुलीचं लग्न पार पडतं. पण मोठ्या माणसांच्या लग्नात काय होतं त्याचं निरीक्षण करणारी ही लहानगी मग वरमाईचे आणि नवऱ्यामुलाचे लग्नातले रुसवेफुगवे लक्षात ठेवून त्याचीही सही सही नक्कल करतात. उगीच नाही
बाहुलीचं लगीन झोकात लागलं
नवरोबाने भांडण काढलं
सारखी गाणी जन्माला येत! शांताराम नांदगावकर यांचं हे गीत सुषमा श्रेष्ठ यांनी गायलंय. नव्यानेच शाळेत जायला लागलेल्या मुलाला आपली खेळणी हळूच दप्तरात घालून आपल्यासोबत न्यावीशी वाटतात. अगदी तसंच एका मुलीला वाटतं की आपली सर्वात लाडकी बाहुली आपल्यासोबत कायम असावी. मग ती आईला लाडीगोडी लावीत विचारते,
बाहुलीचं नाव आई घालूया का शाळेत?
मीच घेऊन जाईन तिला शाळेच्या वेळेत.
मग तिला गणवेश शिवायची विनंती, छोटंसं दप्तर घेऊन द्यायची विनंती करते आणि शेवटी म्हणते,
डबाबिबा नको आई, सांगू का तुला?
माझ्यातली पोळीभाजी देईन मी तिला.
मोठीच गंमत..लहानपण देगा देवा म्हणतात ते काय उगीच? अंथरुणाला खिळलेल्या माणसांनाही शेवटी लहानपण आठवतं म्हणतात ते यासाठीच. कारण बाहुली ही लहानपणीची सखी असते. आणि इवल्या मेंदूला जाणवतं तेवढंच समोर जग असतं. सुख ओंजळीत मावत नाही आणि दु:ख चिमटीबाहेर पडत नाही. जरा रडलं की खाऊ मिळतो आणि आईबाबा आपल्याशी जसे वागतात त्या वागण्याची प्रॅक्टिस करायला बाहुली मिळते. ‘कन्यादान’ या चित्रपटातलं लोकप्रिय गीत ‘लेक लाडकी या घरची’ या गीतात
संपताच भातुकली चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदु हसते होऊनी नवरी लग्नाची
असं सुरेख वर्णन बाहुलीचं केलंय. लाडाची लेक म्हणजे घरातली बाहुलीच असते की! पण तिचं मोठं होणं काही थांबत नाही ती वयात येते आणि तिच्यासाठी बाहुला शोधण्याची वेळ येते. बऱ्याचदा तिला बिचारीला माहीतच नसतं की लग्नानंतरही आपल्याला फक्त नटव्या बाहुलीसारखंच राहायचं आहे आयुष्यभर! जेव्हा तिच्या आयुष्यात तिचा राजकुमार येतो तेव्हा ती वैजयंतीमालासारखी नाचत नाचत म्हणते
बोल री कठपुतली डोरी कौनसंग बांधी
सच बतला तू नाचे किस के लिए
बावरी कठपुतली डोरी पियासंग बांधी
मैं नाचूँ अपने पिया के लिये
खरंच की. कठपुतली हीसुद्धा बाहुलीच, पण तिला आयुष्यभर दुसऱ्याच्या तालावर नाचावं लागतं किंबहुना कुणीतरी नाचवल्याशिवाय ती जागची हलूही शकत नाही. खरं तर बाहुली ही निर्जीवच वस्तू असते. तिचं जिवंतपण सगळं सगळं बघायचं आणि अनुभवायचं असेल तर ते तिच्याशी खेळणारीच्या डोळ्यात पाहून घ्यावं.
या बाई या
बघा बघा कशी माझी बसली बया
ऐकू न येते,
हळूहळू कशी माझी छबी बोलते
कविराज दत्त यांनी आपल्या भाचीच्या बाहुलीला बघून केलेली कविता! तिचं गाणं केलं ते वसंत देसाई यांनी आणि ते गायलंय फैयाज यांनी. पुढे साधना सरगमनेही ते गायलंय. जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात ते आपल्याला खरं जिवंत होऊन कडकडून भेटतं.
बोलक्या बाहुल्या हा व्यवसाय होऊ शकतो आणि तो उत्तम चालून जगप्रसिद्ध शब्दभ्रमकार घडवू शकतो हे आपल्याला दाखवून दिलंय ते रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी. इडगर बर्जन या अमेरिकन शब्दभ्रमकाराच्या खेळातून ते प्रभावित झाले आणि त्यांनी असंख्य प्रयोग करून स्वत:च्या वडिलांकडून आलेल्या या कलेचं
पुनरुज्जीवन केलं. इतकंच नव्हे तर त्याला जगन्मान्यता मिळवून दिली. मुलींचं खेळणं म्हणून कधीकाळी जन्माला आलेल्या या ठकीने अख्ख्या जगाला वेड लावलं ते असं. बरं ही बाहुली काय फक्त भारतातच बनते? छे! पाश्चिमात्त्य देशांतील बार्बी डॉल आता भारतातही भरपूर लोकप्रिय आहे. तिच्यासाठी तर अख्खं घर असतं, मेकअप किट, पर्स, कपडे, किचन सगळं काही असतं. तिथल्या मुली बहुधा
I am the Barbie girl
in my Babie world
असं म्हणत नाचत असतील. अर्थात हे गाणंही जबरदस्त प्रसिद्ध आहे. आपल्याकडे काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडेच कागद, कापड, लाकूड, रबर आणि आता त्यासाठीच्या खास मटेरियलपासून घडवलेल्या सुबक बाहुल्या सगळीकडे पाहिल्या जातात. आपल्या चैत्रगौरीसारखा एक सण तामिळनाडूत साजरा केला जातो त्यात अशा सुंदर सुंदर रंगीबेरंगी सुबक बाहुल्या पायऱ्यांच्या आराशीवर ठेवल्या जातात. अशा गोड आठवणी म्हणजे तिथल्या सासरी गेलेल्या मुलींसाठी ठेवा असतो. घरातून निघून सासरी गेलेल्या मुलीच्या लहानपणीच्या बाहुल्या तिच्या आईने जतणुकीने ठेवलेल्या असतात. कधी त्या पेटीतून बाहेर पडल्या तर त्यांच्या स्पर्शात तिला तिची दूरदूर असलेली लेक मिळत असते. कामं करता करता हलके हलके मग ती गुणगुणत रहाते.
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








