वृत्तसंस्था/ भोपाळ
येथे सुरु असलेल्या 2022 च्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत रेल्वे क्रीडा मंडळाच्या स्पर्धकांनी आपले वर्चस्व ठेवले असून त्यांच्या 8 स्पर्धकांनी विविध वजन गटातून अंतिम फेरी गाठली आहे. लव्हलिना बोर्गोहेन, निखात सरिन, मंजुराणी, ज्योती गुलीया आणि सिमरनजित यांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिलांच्या 6 व्या इलाइट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत रविवारी 48 किलो गटात मंजुराणीने तर 52 किलो गटात ज्योती गुलीयाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2019 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया मंजुराणीने उपांत्य लढतीत मध्यप्रदेशच्या अंजली शर्माचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मंजुराणी आणि तामिळनाडुची एस. केलव्हेनी यांच्यात अंतिम लढत होईल.
महिलांच्या 52 किलो वजन गटात ज्योती गुलीयाने उत्तरप्रदेशच्या सोनियावर 4-1 अशा गुणांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सेनादलाची साक्षी व ज्योती गुलीया यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत होईल. रेल्वे क्रीडा मंडळाच्या अनुपमाने 50 किलो गटात, शिक्षाने 54 किलो गटात, पुनमने 60 किलो गटात, शशीने 63 किलो गटात, अनुपमाने 81 किलो गटात व नुपूरने 81 किलोवरील गटात अंतिम फेरी गाठली आहे. 50 किलो वजन गटात तेलंगणाच्या विद्यमान विश्वविजेती निखात झरीनने उपांत्य लढतीत शिवेंदर कौरचा 5-0 असा पराभव केला. त्याचप्रमाणे आसामच्या लव्हलिनाने मध्यप्रदेशच्या रजपूतचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. लव्हलिनाने टोकीओ ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. आता भोपाळच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची अंतिम लढत सेनादलाच्या अरुंधती चौधरीशी होणार आहे. 57 किलो गटात मनिषाने सोनिया लेथरचा 4-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 60 किलो गटात सिमरनजित कौरने क्रोसचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता सिमरनजित कौर आणि पुनम यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. या स्पर्धेत विविध राज्यांचे 302 स्पर्धक सहभागी झाले असून ही स्पर्धा 12 विविध वजन गटात खेळविली जात आहे.









