सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान किंवा एआयचा चांगलाच बोलबाला आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. शालेय शिक्षण आणि अभ्यासापासून ते संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रापर्यंत या तंत्रज्ञानाचे हात पसरले असून भविष्यकाळ याच तंत्रज्ञानाचा आहे, असे स्पष्टपणे दिसत आहे. जेथे केवळ दैवाच्या आधारावर यश मिळू शकते, अशी आजवर समजूत होती, तेथेही आता हे तंत्रज्ञान उपयोगी पडू लागल्याच्या आश्चर्यकारक घटना घडू लागल्या आहेत. अमेरिकेत कॅरी एडवर्डस् नामक एका वृद्ध महिलेने नुकतीच 1 कोटी 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकली आहे. हे यश आपण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्राप्त केले आहे, असा गौप्यस्फोटही या आजींनी केल्याने सारेजण आचंबित झाले आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग या आजींनी नेमका कशा प्रकारे केला, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी प्रथम चॅटजीपीटीवर जाऊन माझ्याकरिता काही लॉटरी तिकिट क्रमांक आहे का, अशी विचारणा केली. त्यांच्या या प्रश्नावर ‘हा सर्व दैवाचा खेळ आहे,’ असे उत्तर मिळाले. मात्र, चॅटजीपीटीकडून त्यांना काही सूचना आणि क्लृप्ती देण्यात आल्या. त्यांनी या सूचनांचे पालन करत् विशिष्ट क्रमांकाचे लॉटरी तिकिट खरेदी केले. नेमकी त्याच तिकिटाला 1 लाख 50 हजार डॉलर्सची, अर्थात, साधारणत: दीड कोटी रुपयाची लॉटरी लागली. त्वरित हे वृत्त सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरले. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा हा नवाच उपयोग समोर आला. अर्थात, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वांनाच अशी लॉटरी लागेल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण लॉटरी या प्रकाराचे स्वरुपच असे आहे, की जेव्हा कोट्यावधी लोक तिकिटे खरेदी करतात, तेव्हा मूठभर लोकांचा लाभ होतो. पण अमेरिकेतील या प्रकारामुळे या तंत्रज्ञानाची महती आणखी वाढली आहे, हे निश्चित. या आजींनी पुढे जे केले, ते मात्र साऱ्यांसाठी एक आदर्श आहे. त्यांनी लॉटरीत जिंकलेली सारी संपत्ती एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला दान म्हणून त्वरित देऊन टाकली आहे. त्यामुळे या एडवर्डस् आजींवर आता साऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
Previous Articleदुखापतीमुळे विंडीजला आणखी एक धक्का
Next Article खजाना राशिभविष्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









