बेळगाव दक्षिण ‘जैसे थे’ : भाजपकडून 189 उमेदवार जाहीर : जिल्ह्यातून 2 विद्यमान आमदारांना वगळले
प्रतिनिधी/ बेंगळूर
कमालीची उत्सुकता लागून राहिलेल्या भाजप उमेदवारांची यादी अखेर मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. भाजप हायकमांडने राज्यातील 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून अद्याप 35 मतदारसंघांतील नावे जाहीर करणे बाकी आहे. पक्षाने पहिल्या यादीत 52 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातून डॉ. रवी पाटील यांना तर बेळगाव ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. मात्र, विद्यमान आमदार अनिल बेनके यांना तिकीट हुकले आहे. बेळगाव दक्षिणमध्ये विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. खानापूरमधून विठ्ठल हलगेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
निपाणी विधानसभा मतदारसंघातून शशिकला जोल्ले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कत्ती कुटुंबातून दोघांना तिकीट देण्यात आले आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांना चिकोडी-सदलग्यातून तर हुक्केरीतून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे पुत्र निखील कत्ती यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. अथणीमधून महेश कुमठहळ्ळी यांना तर कागवाडमधून श्रीमंत पाटील यांना संधी दिली आहे. त्यामुळे अथणीमध्ये माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी की महेश कुमठहळ्ळी यांना तिकीट मिळणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, सवदींच्या पुढील भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. रमेश जारकीहोळी गोकाकमधून आणि भालचंद्र जारकीहोळी यांना अरभावीतून तिकीट देण्याची घोषणा भाजपश्रेष्ठींनी केली आहे.
भाजप वरिष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुजरात मॉडेलच्या धर्तीवर उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार पहिल्या उमेदवार यादीत सातपेक्षा अधिक विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. निजद-काँग्रेसमधून पक्षांतर करून आलेल्या सर्वांना अपेक्षेप्रमाणे तिकीट देण्यात आले आहे. रामदुर्गमधून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार महादेवप्पा यांना वगळून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. येथून चिक्करेवण्णा यांना रिंगणात उतरविले आहे.
येडियुराप्पा यांच्या पुत्राला शिकारीपूरमध्ये तिकीट
सौंदत्तीचे दिवंगत आमदार आनंद मामनी यांची पत्नी रत्ना मामनी यांना तिकीट दिले आहे. शिमेगा जिल्ह्यातील शिकारीपूर मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे बी. वाय. विजयेंद्र यांना तर हावेरीच्या शिग्गावमधून मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. विजयनगरचे आमदार आनंद सिंग यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सिद्धार्थ सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्वीनी अनंतकुमार यांना तिकीट देण्यात आले नाही.
डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्यांविरुद्ध तडगे उमेदवार
भाजपने प्रथमच मंत्री आर. अशोक आणि व्ही. सोमण्णा यांना दोन मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप गोटातून आश्चर्य व्यक्त होत आहे. आर. अशोक यांना पद्मनाभनगर आणि कनकपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर मंत्री व्ही. सोमण्णा यांना वरुणा आणि चामराजनगरमधून रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे कनकपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध आर. अशोक तर वरुणा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध व्ही. सोमण्णा यांच्यात लढत रंगणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवकुमार व सिद्धरामय्या यांना पराभूत करण्यासाठी भाजप हायकमांडने ही रणनीती आखली आहे.
हुबळी-धारवाड सेंट्रलविषयी उत्सुकता कायम
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना निवडणूक न लढविण्याविषयी भाजप हायकमांडने फोन करून कळविले होते. मात्र, शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हुबळी-धारवाड सेंट्रलमधून कोणाला उमेदवारी द्यावी, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत या मतदारसंघाचे नाव नाही. माजी मंत्री ईश्वरप्पा यांनीही राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे शिमोगा शहर मतदारसंघातून त्यांच्या मुलाला तिकीट द्यावे का, याविषयी चाचपणी करून वरिष्ठ नेते पुढील निर्णय घेतील. मंत्री व्ही. सोमण्णा यांना दोन मतदारसंघातून तिकीट दिले आहे. पण त्यांच्या गोविंदराजनगमध्ये उमेदवाराची घोषणा झाली आहे. लाचप्रकरणी आरोप असलेले माडाळ विरुपाक्षप्पा यांच्या चेन्नगिरी मतदारसंघातही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
यादीत 8 महिला, 9 डॉक्टर
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत अनुसूचित जातीतील 30 तर अनुसूचित जमातीतील 16 जणांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ओबीसीतील 320 जणांची नावे या यादीमध्ये आहेत. 8 महिला उमेदवार, 9 डॉक्टर, निवृत्त अधिकारी, 8 सामाजिक कार्यकर्त्यांना देखील उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी…..
मतदारसंघ उमेदवारांची नावे
चिकोडी-सदलगा रमेश कत्ती
अथणी महेश कुमठहळ्ळी
रायबाग दुर्योधन ऐहोळे
निपाणी शशिकला जोल्ले
कुडची पी. राजीव
कागवाड श्रीमंत पाटील
अरभावी भालचंद्र जारकीहोळी
गोकाक रमेश जारकीहोळी
हुक्केरी निखिल कत्ती
यमकनमर्डी बसवराज उद्री
कित्तूर महांतेश दोडगौडर
बैलहोंगल जगदीश मेटगुड
सौंदत्ती रत्ना मामनी
रामदुर्ग चिक्करेवण्णा
हल्याळ सुनील हेगडे
कारवार रुपाली नाईक
शिरसी विश्वेश्वर हेगडे कागेरी
यल्लापूर अरबैल शिवराम हेब्बार
मुधोळ गोविंद कारजोळ
बागलकोट विरण्णा चरंतीमठ
विजापूर बसवनगौडा पाटील यत्नाळ
मुद्देबिहाळ ए. एस. पाटील नडहळ्ळी
हुबळी-धारवाड पूर्व डॉ. क्रांती किरण
हुबळी-धारवाड पश्चिम अरविंद बेल्लद
धारवाड अमृत देसाई
बिळगी मुरुगेश निराणी
बळ्ळारी ग्रामीण बी. श्रीरामुलू
बळ्ळारी शहर सोमशेखर रे•ाr
बदामी शांतगौडा पाटील
शिकारीपूर बी. वाय. विजयेंद्र
होन्नाळी एम. पी. रेणुकाचार्य
विजयनगर सिद्धार्थ सिंग
उडुपी यशपाल सुवर्ण
चिक्कमंगळूर सी. टी. रवी
तीर्थहळ्ळी अरग ज्ञानेंद्र
औराद प्रभू चौहान
चिक्कबळ्ळापूर डॉ. के. सुधाकर
या विद्यमान आमदारांना वगळले…
अनिल बेनके बेळगाव उत्तर
आनंदसिंग विजयनगर
शिरहट्टी रुद्रप्पा लमाणी
होसदुर्ग गुळीहट्टी शेखर
कुंदापूर हालाडी श्रीनिवास शेट्टी
उडुपी रघुपती भट
रामदुर्ग महादेवप्पा यादवाड
महत्वाच्या लढती…
डी. के. शिवकुमार आर. अशोक
सिद्धरामय्या व्ही. सोमण्णा
एम. बी. पाटील विजुगौडा पाटील
एच. डी. कुमारस्वामी सी. पी. योगेश्वर
आर. व्ही. देशपांडे सुनील हेगडे
गणेश हुक्केरी रमेश कत्ती
काका पाटील शशिकल्ला जोल्ले
डॉ. जी. परमेश्वर अनिलकुमार
जमीर अहमद खान भास्करराव
पक्षांतर केलेल्या जवळपास सर्वांना तिकीट
एस. टी. सोमशेखर, के. गोपालय्या, एम. टी. बी. नागराज, बी. सी. पाटील, डॉ. के. सुधाकर, अरबैल शिवराम हेब्बार, के. सी. नारायणगौडा, मुनिरत्न या मंत्र्यांसह महेश कुमठहळ्ळी, श्रीमंत पाटील, रमेश जारकीहोळी, एन. महेश.
ईश्वरप्पा यांची राजकीय निवृत्ती
तिकीट मिळणार नसल्याचे समजताच निर्णय जाहीर
राज्य भाजपमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होण्याची चिन्हे आहेत. भाजपश्रेष्ठींनी ‘गुजरात मॉडेल’चा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावेळी राज्य भाजपमध्ये गोंधळ माजण्याची चिन्हे आहेत. तिकीट मिळण्याची चिन्हे न दिसल्याने माजी मंत्री आणि भाजपमधील प्रभावी नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी याविषयी पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांना पत्र पाठविल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ माजली आहे.
आपण स्वेच्छेने निवडणूक राजकारणातून निवृत्त होत आहे. त्यामुळे आपल्या नावाचा कोणत्याही मतदारसंघासाठी विचार करू नये. पक्षाने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे, असे ईश्वरप्पांनी पत्रामध्ये म्हटले आहे. ईश्वरप्पाच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्य भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. शिमोग्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षसंघटनेत गुंतण्यासाठी आपण निवडणूक राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पुत्र कांतेश याला शिमोगा शहर मतदारसंघातून तिकीट मिळेल का?, याविषयी आपल्याला माहित नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.









