चिपळूण :
भूविज्ञानातील पुराजीवाश्मशास्त्र विषयाचे पुणे येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अजित वर्तक यांनी साडेसहा हजार कोटी वर्षांपूर्वीचे दुर्मीळ जीवाश्म नमुने येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयाला भेट दिले. मंगळवारी चिपळूणमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हे नमुने वाचनालयाचे मार्गदर्शक व इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
डॉ. वर्तक पुण्याहून चिपळूणला एका खास कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी वाचनालयातील तैलचित्र दालन व वस्तू संग्रहालयाला भेट देत समुद्राच्या अधः स्तरातून सापडलेले दुर्मीळ जीवाश्म नमुने कायमस्वरूपी संग्रहित करण्यासाठी दिले. हे जीवाश्म तामिळनाडूतील क्रिचनापल्ली परिसरातील अरीअलूर भागात आढळले आहेत. या भागात पूर्वी समुद्र असल्याने आणि नंतर तो मागे हटल्याने येथे मोठ्या प्रमाणात खाणींमध्ये प्राचीन समुद्री जीवांचे जीवाश्म आढळतात.

डॉ. वर्तक यांनी याच विषयावर अमोनाईट या खनिजाच्या अभ्यासासह पीएचडी केली आहे. त्यांनी सांगितले की, अरीअलूर भागातील जीवाश्मांचा वैज्ञानिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मोठा अभ्यासमूल्य आहे. हे नमुने चिपळूणमध्ये येणे ही स्थानिकांसाठी अभिमानाची बाब आहे.
याप्रसंगी वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. वास्तू संग्रहालयात या जीवाश्मांचे समावेश झाल्याने त्याचे शैक्षणिक महत्व अधिक वाढेल. विद्यार्थ्यांना, संशोधकांना व इतिहासप्रेमींना प्रत्यक्ष जीवाश्म पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमास पर्यावरण व देवराया संवर्धन विषयावर कार्य करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले, समालोचक सचिन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.








