ही घटना थायलंड या देशाची राजधानी बँकॉकमधील आहे. येथे राहणाऱ्या कुंग नट्टापोन नामक व्यक्तीचा मोबाईल फोन हरविला. चँग वत्थाना नामक एका स्थानी तो हरविला होता. नट्टापोन यांनी तो शोधण्यासाठी बराच प्रयत्न केला. त्यानंतर तो ज्या भागात हरविला होता, तेथेच सापडला. त्यांना आनंद झाला. त्यांनी घरी येऊन त्या फोनची गॅलरी उघडली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी त्वरित पोलिसांकडे धाव घेऊन हा सर्व प्रसंग कथन केला आणि तपासाला प्रारंभ झाला. फोनच्या गॅलरीत त्यांना मानवी अस्थिपंजरांची (सांगाड्यांची) छायाचित्रे आढळून आली. त्यांनी कधीच अशी छायाचित्रे काढलेली नव्हती. मग ती आपल्या फोनमध्ये आली कशी, याचा उलगडा त्यांना होईना. त्यामुळे ते बरेच घाबरले.
पोलिसांनी त्वरीत तपास करण्यास प्रारंभ केला. ज्या स्थानी फोन हरविला होता, ते एक निर्मनुष्य स्थान होते. तेथे एक जुनी इमारत होती. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तपास करताना पोलिसांना एक छिन्नविछिन्न अवस्थेतील मानवी अस्थिपंजर आढळून आला. पोलिसांनी त्वरित गुन्हाविज्ञान शाखेच्या तज्ञांना पाचारण केले. त्यांनी तपासणी केली असता, हा अस्थिपंजर तेथे तीन ते चार महिन्यांपासून पडलेला असल्याचे आढळून आले. त्याच्याजवळ पडलेल्या पाकिटावरुन तो अस्थिपंजर कोणाचा आहे, याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या भावाला शोधून काढले. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा भाऊ अनेक वर्षांपूर्वीच गायब झाला होता. त्याचा शोधण्याचा प्रयत्न करुनही तो सापडला नव्हता. त्यामुळे नंतर त्याच्या कुटुंबाने त्याची आशा सोडली होती. ही व्यक्ती या निर्मनुष्य इमारतीत पोहचली कशी आणि तिची हत्या कोणी केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. चुकून हरविलेल्या फोनमुळे एका रहस्याचा गौप्यस्फोट झाला आहे. तरीही, नट्टापोन यांच्या फोनमध्ये ती छायाचित्रे आली कशी, हा प्रश्न उरलेलाच होता. त्याचे असे झाले होते, की नट्टापोन हे त्या निर्मनुष्य इमारतीत गेले होते आणि त्यांनी तेथील काही छायाचित्रे काढली होती. मात्र तो फोन तसाच् चालू स्थितीत असताना ते तो तेथे विसरले होते. त्यामुळे त्या फोनकडून न कळत अनेक छायाचित्रे काढली गेली होती. त्यात अस्थिपंजराचे छायाचित्रही होते. हे प्रकरण सोशल मिडियावर प्रसारित होत असून तो व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे.









