दाम्पत्याचा नरगुंदकर भावे चौकातील गणेशाला नवस
बेळगाव : चंदगड येथील एक दाम्पत्य खरेदीसाठी बेळगावमध्ये आले असता त्यांचा सोन्याचा दागिना गहाळ झाला. बराच वेळ शोधाशोध करून देखील दागिना काही मिळाला नाही. नरगुंदकर भावे चौक येथील सार्वजनिक गणेशमूर्तीला साकडे घालून हे दाम्पत्य पुन्हा दागिना शोधण्यासाठी गेले असता कचऱ्याशेजारी त्यांना दागिना सापडला. या दाम्पत्याने सोमवारी रात्री उशिरा मंडपात येऊन दागिना मिळाल्याबद्दल नवस पूर्ण केला. त्यामुळे मंगळवारी शहरात हा चर्चेचा विषय ठरला.धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील विजय रामचंद्र पाटील हे पत्नीसमवेत कपडे खरेदीसाठी टिळकवाडी येथील बीएससी मॉल येथे आले होते. मॉलमधील कपडे खरेदी केल्यानंतर हे दाम्पत्य शहरात खरेदीसाठी येणार होते.
त्यावेळी विजय यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचा दागिना गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बीएससी मॉल परिसरात शोधाशोध केली. परंतु त्यांना दागिना काही मिळाला नाही. हे दाम्पत्य औषध खरेदी करण्यासाठी नरगुंदकर भावे चौकात आले होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेशमूर्तीला नवस केला. व पुन्हा ते दागिना शोधण्यासाठी टिळकवाडीत गेले. काळोख असल्याने बराच वेळ शोधाशोध करून देखील त्यांना दागिना मिळाला नाही. अखेर कचऱ्याशेजारी त्यांना दागिना दिसून आला. या दाम्पत्याने रात्री 11 वाजता नरगुंदकर भावे चौकात येऊन गणेशमूर्तीची पूजा केली. दागिना सापडल्यामुळे पाटील दाम्पत्याचा आनंद गगणात मावणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा नवस पूर्ण केला.









