नागालँडच्या होकाटो सेमाला गोळाफेकमध्ये कांस्य : पदकतालिकेत भारत 17 व्या स्थानी
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अफलातून कामगिरी केली आहे. शुक्रवारी उंच उडीत प्रवीण कुमारने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. यानंतर मध्यरात्री नागालँडच्या होकाटो सेमाने गोळाफेक एफ 57 प्रकारात कांस्यपदक पटकावले. 40 वर्षीय होकाटाने अफलातून कामगिरी करत भारताला 27 वे पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे, होकाटो हे माजी सैनिक आहेत. 17 वर्षाचे असताना ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते, पंरतु दुर्देवाने 2002 मध्ये एलओसीजवळ भूसुंरुग निकामी करताना स्फोट झाल्यामुळे त्यांना पाय गमवावे लागले.
शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गोळाफेकच्या अंतिम सामन्यात होकाटो यांनी 14.65 मीटर फेक करून या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले, जे त्यांचे वैयक्तिक सर्वोत्तम देखील होते. या स्पर्धेत इराणच्या यासिन खोसरावीने चौथ्या प्रयत्नात 15.96 मीटर फेक करून सुवर्णपदक तर ब्राझीलच्या थियागो पॉलिनो डॉस सँटोसने 15.06 मीटर फेक करून दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. वयाच्या 40 व्या वर्षी होकाटो यांनी पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. दरम्यान, भारताच्या सोमण राणानेही एफ 57 श्रेणीच्या या अंतिम फेरीत भाग घेतला आणि त्याने दुसऱ्या प्रयत्नात 14.07 मीटर फेक करून पाचवे स्थान पटकावले. सहा प्रयत्न पूर्ण करून तो काही काळ कांस्यपदकाच्या स्थितीतही होता, पण शेवटी तो मागे पडला.
सीमेवर लढताना पाय गमावला
40 वर्षीय होकाटो सेमा नागालँडमधील दिमापूरचे रहिवासी आहेत. होकाटोने गतवर्षी हाँगझाऊ पॅरा गेम्समध्येही कांस्यपदक जिंकले होते. हांगझू पॅरा गेम्सची सुरुवात सरासरी 13.88 मीटर फेकने केली होती, परंतु त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि पदक जिंकले. पाठोपाठ पॅरिस पॅरालिम्पिकमध्येही त्याने पदक जिंकण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणारे 40 वर्षीय होकाटो हे नागालँडचे एकमेव खेळाडू आहेत.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या होकाटो यांनी भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर काम केले आहे. 2002 मध्ये, जम्मू काश्मीरमधील चौकीबाल येथे दहशतवादविरोधी कारवाईत भाग घेत असताना भूसुरुंगाच्या स्फोटात त्यांचा डावा पाय गमवावा लागला. मात्र, तरीही त्याने हार मानली नाही. या अपघातातून सावरल्यानंतर होकाटो पॅरा अॅथलीट बनले. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार होकाटो यांनी गोळाफेकचा पर्याय निवडला. 2016 पासून त्यांनी या खेळात भाग घेण्यास सुरुवात केली. आजघडीला, होकाटो यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पदके जिंकली आहेत.
पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 27 पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. यात प्रवीण कुमारने उंच उडीत पटकावलेले भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारताने आतापर्यंत 6 सुवर्ण, 9 रौप्य व 12 कांस्यपदकासह एकूण 27 पदके जिंकली आहेत. अपेक्षेप्रमाणे चीन या यादीत प्रथम स्थानी असून ग्रेट ब्रिटन दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे.
समारोप सोहळ्यात हरविंदर सिंग, प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक
सुवर्णपदक विजेता तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांची पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये समारोप सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. पॅरिस स्पर्धेचा समारोप रविवारी होणार आहे. हरविंदर सिंगने भारताला तिरंदाजीच सुवर्णपदक जिंकवून दिले होते. प्रीतीने या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला दोन कांस्यपदकं मिळवून दिली. यामुळे या दोघांना हा बहुमान मिळाला आहे. दरम्यान, पॅरालिम्पिक समारोप सोहळ्यात ध्वजवाहकाचा मान मिळणे, हा आमच्यासाठी मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया हरविंदर व प्रीती यांनी दिली.









