तब्बल 22 दिवस पिके गेली पाण्याखाली : भात व अन्य पिके कुजली
आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी
अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकविणारा बळीराजा आहे. मात्र हा बळीराजा अतिवृष्टी, दुष्काळ व बाजारभाव अशा चक्रव्युहात सापडलेला दिसून येतो. गेल्या तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी मागील महिनाभर झालेल्या पावसामुळे पश्चिम भागातील नदीकाठावरील शेतजमिनीतील पिके कुजून गेलेली आहेत. यामुळे यंदा आमचा उदरनिर्वाह होणार कसा, याची चिंता इथल्या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.
गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीकाठच्या शिवारात पाणी साचून बेळगुंदी व सोनोली शिवारातील शेकडो एकर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्यामुळे शिवारातील भात व अन्यपिके तब्बल 22 दिवस पाण्याखाली होती. यामुळे ही पिके सध्या कुजून गेलेली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
‘नदीला पूर आला आणि सारंच वाहून गेलं’ असं म्हणण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. कारण मार्कंडेय नदीकाठाजवळ असलेल्या भात, रताळी व अन्य पिकांमध्ये पाणी साचून राहिले होते. आणि सध्या गेल्या तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या शेतातील पाणी कमी झाले आहे. मात्र 22 दिवस पाण्याखाली गेलेली पिके पूर्णपणे कुजून जमीन दोस्त झालेली आहेत. हे पाहून अक्षरश: शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आहे.
नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात मुसळधार पाऊस होण्यापूर्वीच भातरोप लागवड केली होती. भातरोप लागवड करण्यात आली आणि जोरदार पावसाने सुऊवात केली. राकसकोप जलाशयाचे तीन दरवाजेही उघडण्यात आले. त्यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाट वाढ झाली. सोनोली व बेळगुंदी परिसरातील या नदीला पूर आला आणि नदीच्या आजूबाजूच्या शिवारात थेट नदीचे पाणी गेले व शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली.
पावसाचे प्रमाण कमी होईल, आज पाऊस विश्रांती घेईल, उद्या विश्रांती घेईल, असे म्हणत इथला शेतकरी पावसाच्या उघडीपीची वाट पाहत होता. मात्र पावसाने विश्रांती लवकर घेतलीच नाही. पावसाचा जोर वाढतच होता. त्यामुळे 22 दिवस पाण्याच्या खाली असलेले पिके सध्या कुजून गेलेली आहेत.
भातरोप लागवड करण्यासाठी मशागत करण्यात आली होती. त्यामध्ये शेणखत घालण्यात आले. त्यानंतर पॉवर ट्रिलरच्या साह्याने व बैलजोडीच्या साह्याने मशागत करण्यात आली. यामध्ये खताची फवारणी करण्यात आली. त्यानंतर शेतमजुरांच्या सहाय्याने भातरोप लागवड करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांनी वारेमाप पैसा खर्च केलेला आहे. मात्र पीक बहरून येण्याआधीच पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
सोनोली-कुद्रेमनी संपर्क रस्ता आठ दिवस बंदच
या मुसळधार पावसामुळे सोनोली-कुद्रेमनी संपर्क रस्त्यावरील पुलावर पाणी आले होते. त्यामुळे आठ दिवस या रस्त्यावरील संपर्क तुटला होता. तसेच बेळगुंदी-सोनोली नाल्यावरील रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे इथेही पाच दिवस रस्ता बंद होता. तर नदीच्या काठाची जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. या मुसळधार पावसात इथले दृश्य पाहता लांबच्या लांब शेत शिवार पाण्यात गेलेले दिसून येत होते.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी
या भागातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे इथं केवळ शेतीच्या उत्पन्नावरच उदरनिर्वाह होतो. यंदा मात्र पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे प्रशासन व कृषी खात्याच्या मार्फत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी धोरणात्मक कार्य होणे गरजेचे आहे.









