तरीही बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून बाहेर : नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया
बेळगाव : बेळगाव तालुक्यात 32 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असे असले तरी सरकारने मात्र बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय तातडीने तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी होवू लागली आहे. दुष्काळग्रस्त यादीतून बेळगाव आणि खानापूर तालुका वगळण्यात आला आहे. यंदा सरासरी कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील भात, ऊस, कापूस, सोयाबिन आणि भुईमूग पिकांची हानी झाली आहे. परिणामी बि-बियाणे, खते आणि कीटकनाशकांसाठी केलेला खर्चदेखील वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली सापडला आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यात बेळगाव आणि खानापूर तालुक्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे. शिवाय याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून कधी जाहीर करणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. त्यानंतर जुलैच्या अखेरीस काहीसा समाधानकारक पाऊस झाला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवड केली होती. त्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके करपून गेली आहेत. काही ठिकाणी पूर्णपणे पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरात पिकांची हानी झाली आहे. त्यापैकी एका बेळगाव तालुक्यात 32 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. याबरोबर सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल आदी तालुक्यांमध्येदेखील पिकांची मोठी हानी झाली आहे. मात्र बेळगाव आणि खानापूर तालुका वगळता इतर तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर
बेळगाव तालुक्यात 32 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. विशेषत: भात पिकांची हानी अधिक झाली आहे. त्याबरोबर सोयाबिन, कापूस, भुईमूग आणि इतर पिकांनाही फटका बसला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.
– एम. एस. पटगुंदी-तालुका कृषी अधिकारी









