लाल किल्ल्यावरुन 78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, आत्मनिर्भरतेवर भर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या देशाला घराणेशाही आणि जातीयवाद यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन वैगुण्यांना नाकारण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना केले. हा त्यांचा सलग 11 वा स्वातंत्र्यदिन संदेश होता. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताची प्रगती होत असून नजीकच्या भविष्यकाळात भारत संरक्षणसाधनांच्या उत्पादनांचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला 6 हजारांहून अधिक निमंत्रितांची उपस्थिती होती.
आपल्या 98 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये देशाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. तसेच भविष्यकाळासाठीच्या विविध योजनांचाही उल्लेख केला. भारताला वैश्विक महासत्ता बनविण्याचे आपल्या सरकारचे ध्येय आहे. त्या ध्येयाप्रत आमची वाटचाल वेगाने होत आहे. देशाच्या घटनेलाही आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेने दलितांचे आणि शोषितांचे अधिकार सुरक्षित पेले आहे. लोकशाहीचा पाया म्हणजे आपली राज्य घटना आहे. केंद्र सरकार या घटनेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. देशातील 140 कोटी लोकांनी घटनेचे रक्षण केले तर घटनाही त्यांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, असे विचार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
बांगला देशसंबंधी चिंता
बांगला देशात आज जे घडत आहे, त्यासंबंधी भारतातील सर्वांनाच चिंता वाटत आहे. तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची सुरक्षा हा भारतासाठीही महत्वाचा विषय आहे. तेथील परिस्थिती लवकर सुधारेल अशी आशा आहे. आपल्या शेजारच्या देशांमध्ये शांतता असावी अशी भारताची नेहमीच अपेक्षा राहिली आहे. बांगला देशाच्या विकासात भारताचेही योगदान महत्वाचे असून आम्ही तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवलेले आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
आतील आणि बाहेरील आव्हाने
आज देशसमोर जशी बाह्या शक्तींची आव्हाने आहेत, तशी अंतर्गत आव्हानेही आहेत. भारताने कधीही जगाला युद्धात लोटलेले नाही. मागच्या 1 सहस्र वर्षांमध्ये भारतावर आक्रमणे झाली. भारताने प्रतिकार केला पण कधीही प्रतिआक्रमण केले नाही. तरीही भारताकडे वक्रदृष्टी असणाऱ्या शक्ती जगात कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे मनोरथ कधीही पूर्ण होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. देशाच्या आतही काही विकासविरोधी शक्ती गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, केंद्र सरकार समाज आणि कायदा-सुव्यवस्था यांचे रक्षण करुन या कुशक्तींना हाणून पाडेल, अशा अर्थाचा संदेशही त्यांनी दिला आहे.
आरोग्य क्षेत्राला बळकटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आरोग्यविषयक महत्वाकांक्षी योजनांचाही उल्लेख केला. वैद्यकीय शिक्षणासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणात कर्जे काढून आणि पैसे खर्च करुन परदेशी जावे लागत होते. हे टाळण्यासाठी देशातच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण व्यवस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा 1 लाखांपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. येत्या 5 वर्षांमध्ये ही संख्या आणखी 75 हजारांनी वाढणार आहे. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होण्यासमवेतच आरोग्य संपन्न देश बनविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक शिक्षण पद्धती
एकवीसाव्या शतकाला अनुकूल अशी नवी शिक्षण पद्धती आम्ही लागू करीत आहोत. विकसीत भारतासाठी विकसीत शिक्षणाचीही अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी आम्ही नव्या योजना आणल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची वेळ येऊ हे आमचे उद्दिष्ट्या आहे. देशातच त्यांना रोजगारक्षम आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. या धोरणाचे सुपरिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धर्मानिरपेक्ष नागरी कायदा हवा
देशात आजवर जे नागरी आणि व्यक्तीगत कायदे आहेत, ते धर्मवादी आहेत. त्यांच्यास्थानी सर्वांसाठी समान असणारी धर्मनिरपेक्ष नागरी आणि व्यक्तीगत संहिता लागू करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने सरकार पावले टाकत आहे, असे सूचित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचाही विषय मांडला.
विरोधी पक्षांवर शरसंधान
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. काही लोकांना देशाचा विकास होत असलेला पाहवत नाही. ते देशासंबंधी सुविचार करु शकत नाहीत. आपले चांगले होत नसेल, तर दुसऱ्याचेही चांगले होऊ द्यायचे नाही, अशी त्यांची संकुचित आणि नकारात्मक विचारसरणी आहे. संख्येने मूठभर असणारे असे लोक विनाशाचा मार्ग मोकळा करतात. अराजकाला निमंत्रण देतात. सर्वसामान्य जनतेने अशा विकासविरोधी आणि समाजविरोधी तत्वांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाच महत्वाच्या मुद्द्यांवर भर…
ड महिला सुरक्षा
पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निर्घृण प्रकाराचा उल्लेख. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाहीररित्या कठोर आणि धाक बसले अशी शिक्षा देण्याच्या आवश्यकतेचे केले प्रतिपादन.
ड आर्थिक सुधारणा
भारताच्या सर्वांगिण विकासासाठी आर्थिक सुधारणांची गती वाढविणे अत्यावश्यक. या केंद्र सरकारच्या पूर्वी सुधारणांमध्ये होता मोठा गतीरोध. त्यामुळे देशाची अपरिमित आर्थिक हानी. मात्र आता देश वेगाने प्रगतीपथावर
ड एक देश, एक निवडणूक
संसाधनांच्या योग्य उपयोगासाठी एक देश एक निवडणूक ही संकल्पना महत्वाची. ती लागू करण्यासाठी सर्व संबंधिकांशी सरकारची सविस्तर चर्चा. देशातील नागरीकांनीही या संकल्पनेचे जोरदार समर्थक करण्याची आवश्यकता.









