जुगार खेळण्याचा नाद सर्वपरिचित आहे. हा विषेशतः पुरुषांनी खेळण्याचा खेळ मानला जातो. महाभारतात पांडवांनी कौरवांशी द्यूत खेळून सर्वस्व गमावले, हा इतिहास आहे. तथापि, सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिला चमकू लागल्या आहेत. याला जुगाराचे क्षेत्रही अपवाद नाही. ऑनलाईन गँबलिंग किंवा जुगारात तर महिला पुरुषांवर मात करतील, अशी स्थिती आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे एका महिलेने अजबच प्रकार केला. तिने आपल्या घरमालकाशीच द्यूताचा डाव मांडला आणि स्वतःला हरवून घेतले. कारण तिने स्वतःलाच पणाला लावले होते. हा डाव हरल्यावर ती घरमालकाची दासी बनली. हे वृत्त कळताच जयपूर येथे काम करणारा तिचा पती अक्षरशः हादरला. तो तातडीने प्रतापगढ येथे परतला आणि त्याने पोलिसांमध्ये तक्रार सादर केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. स्वतःला पणाला लावलेली महिला आणि ज्याच्याशी खेळताना ती हारली, तो तिचा घरमालक या दोघांचीही चौकशी सुरु आहे. भारतात जुगार अवैध आहे. येथे तर जुगारात या महिलेने स्वतःलाच पणाला लावल्याने आता कोणत्या तरतुदींनुसार गुन्हा सादर करावा, यावर विचार केला जात आहे. सध्या आसपासच्या परिसरात हा मोठाच चर्चेचा विषय बनला आहे. असा विचित्र जुगार यापूर्वी कधी कानावर पडला नव्हता. असे प्रथमच घडत आहे, अशीही प्रतिक्रिया ऐकू येत आहे.

जगभराचा विचार केला तरी, ऑन लाईन जुगारात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. काहीवेळा तर त्या पुरुषांवर मात करताना दिसतात. आज महिला ऑन लाईन जुगाराच्या कंपन्याही चालवत आहेत. साहजिकच याही क्षेत्रात आता पुरुषांना महिलांच्यासह काम करावे लागणार असे दिसते. ब्रिटनसारख्या देशात तर ऑनलाईन जुगारात महिलांचा सहभार 42 टक्के आहे. सध्या जगात 2,000 हून अधिक ऑनलाईन जुगारघरे आहेत.









