मोदींकडून दु:ख व्यक्त
लंडन:
प्रमुख अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. निधनासमयी ते 94 वर्षांचे होते. पॉल यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. स्वराज पॉल यांनी ब्रिटनमध्ये परोपकार आणि सार्वजनिक सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासोबत भारत-ब्dिराटन संबंधांमध्ये मोठे योगदान दिले होते असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
ब्रिटनमधील कॅपारो ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक पॉल यांचा जन्म पंजाबच्या जालंधर येथे झाला होता. 1960 च्या दशकात ते स्वत:ची कन्या अंबिकावरील उपचारासाठी ब्रिटनमध्ये दाखल झाले होते. ज्यानंतर पॉल यांनी एक धर्मादाय ट्रस्टच्या स्वरुपात अंबिका पॉल फौंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेने शिक्षण आणि आरोग्य पुढाकारांच्या माध्यमातून जगभरातील मुले आणि युवांच्या कल्याणासाठी लाखो डॉलर्सची देणगी दिली आहे. तर 1975 साली त्यांनी इंडो-ब्रिटिश असोसिएशनची स्थापना केली होती. पॉल यांना 1983 मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषणने गौरविण्यात आले होते. कॅपारो ग्रूपचा स्टील आणि इंजिनियरिंगच्या क्षेत्रात मोठा व्यवसाय आहे. या ग्रूपचे मुख्यालय लंडनमध्ये असून ब्रिटन, अमेरिका आणि भारतासह मध्यपूर्वेत हा ग्रूप कार्यरत आहे. स्वराज पॉल यांचे पुत्र आकाश पॉल हे कॅपारो इंडियाचे अध्यक्ष आणि कॅपारो समुहाचे संचालक आहेत.









