अध्याय सहावा
अंत्यसमयी ज्याचं स्मरण होतं त्या ठिकाणी मनुष्य मृत्यूनंतर जाऊन पोहोचतो. हे वाचलं की, आपण आता तसंच करूयात असं ठरवतो आणि नामस्मरण करायला सुरुवात करतो. परंतु काही काळाने ते विसरून संसारिक गोष्टीत रमून जातो. हे सर्व मायेच्या प्रभावाने घडून येतं. म्हणून चिकाटीने नामस्मरणाचा अभ्यास करावा लागतो. ईश्वराचे दिवसरात्र स्मरण करावे म्हणजे अंत्यसमयी त्याची आठवण होईल. त्याचा दुसरा एक फायदा असा होतो की, ईश्वर सतत आपल्या बरोबर आहे ह्या जाणिवेने आपण दु:ख, संकटात एकटे नाही या कल्पनेने मनाला सतत धीर मिळून त्यांची तीव्रता कमी होते. आपण ईश्वराचे अंश आहोत हे लक्षात घेऊन जे स्मरण केलं जातं त्याला बोधजन्य स्मरण असं म्हणतात. ह्या बोधामुळे त्याच्या सतत होणाऱ्या स्मरणाला नित्य स्मरण असं म्हणतात. विविध कर्तव्ये पार पाडत असताना होणारे ईश्वराचे स्मरण हे क्रियाजन्य स्मरण असते. अभ्यासाने हे शक्य होते म्हणून याला अभ्यासजन्य स्मरण असेही म्हणतात. अहर्निश ईश्वराचे स्मरण करत संसारिक कार्ये करावीत. म्हणजेच ईश्वराचे स्मरण प्राधान्याने करावे. आपण करत असलेले काम ईश्वराने आपल्याला दिलेले आहे असे समजून त्याच्या स्मरणात ते करत राहिल्यास सर्वोच्च आनंद मिळतो. ईश्वराचे स्मरण सर्वोच्च कसे ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
ब्रह्मविष्णुशिवेन्द्राद्याँल्लोकान्प्राप्य पुनऽ पतेत् ।
यो मामुपैत्यसंदिग्धऽ पतनं तस्य न क्वचित् ।। 19।।
अर्थ- ब्रह्मदेव, विष्णु, शिव, इंद्र इत्यादिकांच्या लोकांना गेल्यानंतर मनुष्य त्याच्या पुण्याचा क्षय झाल्यावर पुन्हा मृत्युलोकी पतन पावतो. पण जो संशयरहित न होता मजप्रत येतो त्याला कोठेही पतन नाही.
विवरण- मनुष्य त्याच्या त्याच्या आवडीने ईश्वराचा निरनिराळ्या अवतारातील सगुण मूर्तींची पूजा करत असतो. त्यांची भक्ती करत असतो. म्हणून मृत्यूनंतर त्याला त्या त्या देवतांचे लोक म्हणजे त्यांची राहण्याची ठिकाणं प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ वैकुंठ, कैलास इत्यादि परंतु पुराणातील दाखल्यानुसार भक्तांचं पुण्य संपुष्टात आलं की, मनुष्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. ईश्वराची आराधना करणारा मात्र गणेशाप्रति पोहोचतो तेथून मात्र तो कधी परत येत नाही. ह्यासाठी साधक अनेक जन्म तपश्चर्या करत असतो. जरी हा प्रवास अनेक जन्मांचा असला तरी तो उत्तरोत्तर रंगतदार होत जातो कारण ह्या प्रवासात त्याची साथसंगत सदैव साधकाला लाभते. अशा अनन्य भक्ताचा योगक्षेम बाप्पा स्वत: चालवतात हे पुढील श्लोकात बाप्पानी सांगितलं आहे.
अनन्यशरणो यो मां भक्त्या भजति भूमिप ।
योगक्षेमौ च तस्याहं सर्वदा प्रतिपादये ।।20।।
अर्थ- हे राजा, जो अनन्यशरण होऊन माझी भक्ति करतो त्याचा ईश्वराशी योग मी साधून देतो आणि त्याचे आत्यंतिक कल्याण करतो.
विवरण- अनन्य म्हणजे अन्य कुणीच नाही, फक्त ईश्वर एके ईश्वर असा ज्याचा भाव असतो. त्याला कसलीच काळजी करावी लागत नाही. एरव्ही अमुक एक वस्तू आपल्याला मिळेल की नाही याविचाराने मनुष्य काळजीत असतो पण जो ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने त्याचं सदैव स्मरण करत असतो त्याच्या ईश्वर सदैव बरोबरच असतो आणि याची अनुभूतीही त्याला येत असल्याने तो सदैव निष्काळजी असतो. वास्तविक पाहता ईश्वराची साथ सर्वांनाच लाभलेली आहे पण मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असल्याने त्याला बरोबर असलेल्या ईश्वराच्या उपस्थितीची जाणीवच असत नाही. पण अनन्य भक्ताचं तसं नसतं. त्यानं स्वत:चं अस्तित्व केव्हाच ईश्वरात विलीन करून टाकलेलं असतं. ईश्वराशिवाय तो अन्य काही जाणतच नसतो.
क्रमश:








