जुन्या काळातल्या बायकांच्या भजनाच्या वहीमध्ये श्रीकृष्णजन्माचे एक गाणे हमखास असायचे. ‘वैकुंठवास हरीचा, बंदीत जन्म झाला, तो मास श्रावणाचा, दिनवद्य अष्टमीचा, चंद्रोदयी निशेला..’ वसुदेव-देवकी सचिंत होऊन बसले होते. आता हे आठवे अपत्य कंसाचा वध करणार की कंस त्याला जन्मतः उचलून नेणार? या विचारात असताना काय झाले? तर- ‘वय अष्ट बालमूर्ती, इतक्मयात आली पुढती, हो हर्ष उभयताला..’ तेव्हा देवकी माता त्याला म्हणाली, ‘होई लहान बाळा, दावी जगास लीला..’ मग तो कन्हैया लहान झाला आणि सर्वांना आनंद झाला. विष्णूचे अनंत अवतार आहेत म्हणून संत नामदेवराय म्हणतात, ‘अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी’. श्रीमद् भागवतात चोवीस अवतार सांगितले आहेत परंतु मुख्य दहा अवतार आहेत. त्यातला आठवा अवतार श्रीकृष्ण. कोणताही धार्मिक सप्ताह झाला की आठवे दिवशी गोपाळकाला करतात. आठ ही संख्या श्रीकृष्णाला प्रिय आहे म्हणून त्याने वयाच्या आठव्या वषी गोकुळवासियांना म्हटले, ‘तुम्ही इंद्राची पूजा का करता? आपले रक्षण करणाऱया गोवर्धनाचीच पूजा करा.’ त्या आठवषीय बालकाचा आदेश पाळून गोकुळवासियांनी आपली परंपरागत रुढी चक्क मोडली. म्हणून तो ‘गोवर्धन गिरीधारी’ झाला.
माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले आहे. माणसाच्या हाताला जी पाच बोटे आहेत त्यामधील प्रत्येक बोटामध्ये एक एक असे महातत्त्व आहे. अंगठय़ामध्ये तेज, तर्जनीत वायू, मध्यमेत आकाश, अनामिकेत पृथ्वी आणि करांगुलीमध्ये जलतत्त्व आहे. गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलून श्रीकृष्णाने जलतत्त्वाला नियंत्रित करून दाखवून दिले की तो पंचमहाभूतांचा स्वामी आहे. श्रीकृष्णाची दोस्ती ही पृथ्वी तत्वातल्या अणूरेणूंशी आहे. माता यशोदेच्या चोरून तो माती खातो. ती त्याच्या बाळगोपाळ मित्रांना सांगते, ‘कृष्ण माती खाताना दिसला तर लगेच मला सांगा.’ एक दिवस सकाळी सकाळी बाळकृष्णाचे सवंगडी यशोदेकडे आले. संत नामदेवराय म्हणतात, ‘मुले सांगताती, माती खातो गे श्रीपती’. यशोदा लाकूड घेऊन त्याच्या मागे धावली. श्रीकृष्णाने आ वासला, तेव्हा ‘ब्रम्हांडे देखिली। नामा म्हणे वेडी झाली।।’ संत तुकाराम महाराज म्हणतात, यशोदेने त्याच्या मुखात चौदा भुवने फिरताना पाहिली तरी ती या जगाच्या बापाला ‘माझे बाळ माझे बाळ’ असेच म्हणते. तिला त्याच्या ईश्वरी सत्तेची भूल पडली. कारण तो मायावंत आहे. भगवंत जेव्हा जन्माला आले तेव्हा ते अलौकिक रूप बघून वसुदेवाने देवकीला घट्ट आलिंगन दिले. देवकीला मात्र कंसाची भीती वाटली. ती म्हणाली, ‘सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी..’ जन्माला येण्यापूर्वी स्वतःचे चतुर्भुज रूप परमात्म्याने दाखवूनही तिला भीती वाटली ही त्या कृष्णाची मायाच आहे. म्हणून तर यमुना नदी कमालीची सावध आहे. वसुदेव जेव्हा मायेला घेऊन निघाले तेव्हा यमुना मायेला म्हणाली, ‘आज मी तुला रस्ता देते; परंतु जेव्हा मला आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचे असेल तेव्हा तू मला प्रतिबंध करायचा नाही.’ माया हो म्हणाली आणि यमुना दुभंगली.
पृथ्वी तत्वाचे प्रधान रूप असलेल्या वृक्षवेली, पर्वत, पशुपक्षी यांच्याशी श्रीकृष्णाचे जिव्हाळय़ाचे नाते आहे. कदंब, पारिजातक आणि तुळस यांना परमात्म्याचे सान्निध्य आहे. वृक्षाची कन्या बासरी तर त्याची जिवलग सखी आहे. गोवर्धनाची पूजा बांधून कृष्णाने त्याचा गौरव केला. गाय आणि श्रीकृष्ण यांचे अद्वैत आहे. कृष्णाने गाईची धार काढण्याचा उत्सव नंदाघरी मोठय़ा थाटामाटात साजरा झाला. कृष्णाच्या बारशाला त्याच्या अंगावरून गाईची शेपटी फिरवली. कृष्ण जेव्हा वनात गाई चरायला घेऊन जात असे तेव्हा एखाद्या भाग्यवान गायीच्या पाठीवर त्याची काठी बसली की तिचे कर्म संपत असे. मोरपीस त्याच्या मुकुटी आहे. कृष्णाचे जलतत्त्वावर प्रभुत्व आहे. पुष्कळ फण्या असलेला महाभयंकर कालिया नाग यमुनेच्या डोहात लपून बसला होता. त्याच्या फण्यांवर नृत्य करून आपली पदचिन्हं उमटवून त्याला निर्भय करीत परिवारासह समुद्राकडे श्रीकृष्णाने त्याला पाठवून दिले. यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘कालिंदीचे हृदयशल्य फेडिले.’ याचे स्पष्टीकरण करताना डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणतात, ‘कालिया नागाने डोह नासवून गाईगुरे, गोपगोपी यांच्यावर प्राणसंकट आणले होते. म्हणून कृष्णाने हे बरेच केले असे आपल्याला वाटते. परंतु माऊलींचे मन किती उन्नत! त्यांना कालियामर्दनात एका स्त्रीची दुःखमुक्ती दिसली. कालिंदी नावाच्या नदीरूप स्त्रीच्या अंतःकरणात कालिया नावाचा काटा सलत होता. कृष्णाला कालियाचा नायनाट करायचा नव्हता, तर कालिंदीला दुःखमुक्त करणे हा त्याचा हेतू होता. श्रीकृष्णाचे हे मानवीपण आणि अति मानवीपण फक्त माऊलीच जाणतात.’
यमुनेच्या डोहात पडलेला चेंडू काढायला कृष्णाने यमुनेत उडी मारली तेव्हा कालिया झोपला होता. त्याच्या पत्नीला कृष्णाने विचारले, चेंडू आहे का? तेव्हा तिला कृष्ण कसा दिसला? तर ‘लावण्यपुतळा मुखप्रभारासी’, ‘कोटी रविशशी उगवले’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात. गोपी म्हणतात, आम्ही लोणी अंधारात लपवून ठेवतो, पण हा तिथे गेल्यावर प्रकाश पडतो आणि प्रकाशात सर्वांना सर्व दिसते. जगाचा अंधार घालवणारा श्रीकृष्ण सर्व प्राणिमात्रात जठराग्नीच्या रूपाने वास करतो. श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र वायू तत्त्वाचे प्रतीक आहे. महाभारत युद्धानंतर त्याने ते गंडकी नदीत विसर्जित केले तेव्हा ते प्रचंड वेगाने प्रवाहाच्या उलटे फिरत नदीतील पाषाणांवर आपटत गेले. सुदर्शन चक्राची मुद्रा ज्या पाषाणावर उमटली ते शाळीग्राम. शाळीग्रामाची पूजा म्हणजे पंचमहाभूतातील वायु तत्वाची उपासना आहे. गोपाळकृष्ण साक्षात नादब्रह्म आहे. त्याच्या हातामध्ये असलेली बासरी हे आकाश तत्व आहे. माणसाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर पंचमहाभूते स्वाधीन करून घेतली असली तरी आकाश तत्त्वाचा शोध अद्याप मानवाला लागलेला नाही. आकाश तत्व अतिशय सूक्ष्म आहे. ते फक्त सद्गुरूकृपेने प्राप्त होऊ शकते. संत भानुदासांचे पद आहे ‘वृंदावनी वेणू’ या नावाचे. या वेणू नादाने गोवर्धन गाजतो, पशुपक्षी स्तब्ध होतात, गाय, व्याघ्र एका ठिकाणी स्थिरावतात. ‘यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडळ चालता स्तब्ध होय। शेष कुर्म वराह चकीत राहे।।’ यापेक्षाही ‘बाळा स्तन देऊ विसरली माय’ ही अशक्मय कोटीतील गोष्ट मुरलीच्या ध्वनीमुळे घडते.
पाश्चात्य विज्ञान संशोधक म्हणतात, पंचमहाभूतांची शक्ती मिळावी म्हणून घरात त्याची प्रतिके ठेवावी. भारतीय संस्कृती सांगते, घरात असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेला नमस्कार करा. पंचमहाभूते त्याच्यापाशी लीन आहेत. कारण तो पंचमहाभूतांचा स्वामी आहे. त्यामुळे आपोआपच पंचमहाभूतांची शक्ती मिळते.
-स्नेहा शिनखेडे








