राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे प्रतिपादन
बेळगाव : भगवान महावीर हे अहिंसेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी ऐशोरामाचा त्याग करून समाजासाठी जीवन व्यतित केले. जगा आणि जगू द्या हा त्यांचा महत्त्वाचा संदेश आपण नेहमी लक्षात ठेवायला हवा, असे विचार राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले. सिद्धसेन रिसर्च फौंडेशन येथे सुरू असलेला 2550 वा निर्वाण महोत्सव व पूज्य आचार्यरत्न श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांची 92 वी जयंती, 25 वा दीक्षा महोत्सव अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. राज्यपालांनी प. पू. बालाचार्य श्री 108 सिद्धसेन गुरुदेव यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रात सिद्धसेन महाराज यांचे कार्य मोठे आहे, असे ते म्हणाले. समाज बांधणीमध्ये धर्माची भूमिका महत्त्वाची आहे. धर्माच्या माध्यमातून समाजामध्ये शांतता नांदली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.









