गोविंददेव गिरीजी महाराज यांची व्याख्यानमाला
बेळगाव : भगवान श्रीकृष्ण हे युद्ध कलेमध्ये पारंगत होते. बऱ्याचवेळा माघार अथवा पलायन करून युद्ध जिंकता येते, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीकृष्णांच्या याच नितीचा वापर स्वराज्य निर्मितीसाठी केला. माघार घेऊन शत्रूवर चाल करण्याच्या या युद्धनितीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगभर गाजावाजा झाला, असे विचार मथुरा येथील गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मांडले. गुरुदेव रानडे मंदिर (एसीपीआर) तर्फे आयोजित व्याख्यानमालेत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी शुक्रवारी ‘श्रीकृष्ण निती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, धर्म ही एक गंभीर संकल्पना आहे. त्याला इंग्रजीमध्ये कोणताच तंतोतंत जुळणारा शब्द नाही. धर्म हा कोणत्याही पंथाशी संबंधित शब्द नसून ती एक जगण्याची पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचा समाज हा अध्यात्मापासून काहीसा दूर आहे. नवीन पिढीला तर सूर्योदय देखील माहिती नाही. त्यामुळे सूर्योदयाला दिवसाची सुरुवात करायची ही संकल्पनाच मागे पडत आहे. जप केल्याने एकाग्रता वाढते, मगच आपले ध्यान योग्यरित्या होऊ शकते. त्यामुळे ध्यान करण्यासोबतच जपदेखील करावा, असा संदेश त्यांनी दिला.









