मथुरा / वृत्तसंस्था
मथुरेच्या कृष्णजन्मभूमीचा वाद नवे वळण घेण्याची शक्यता आहे. कृष्णजन्मभूमीच्या परिसरात असणाऱया इदगाहची भूमी प्रत्यक्षात तेथील मंदिरातील कृष्णमूर्तीच्या मालकीची असून त्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन या प्रकरणातील वादींनी केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. या मालकी अधिकाराची कागदपत्रे न्यायालयात देण्यात आली आहेत.
मथुरेचे न्यायाधीशांनी हे पुरावे आणि याचिका सादर करुन घेतली असून विरुद्ध बाजूला प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे. कृष्णजन्मभूमीसंबंधीचा अभियोग ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान’ या मूर्तीच्या नावे सहकारी रंजना अग्निहोत्री आणि अन्य सहा भक्तांनी सप्टेंबर 2020 मध्ये सादर केला होता. तथापि, तो फेटाळला गेला होता. आता पुनर्विचार याचिका सादर करण्यात आली आहे.
जिल्हा न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका सादर करुन घेतली असून मूळ अभियोग पुनर्जिवित केला आहे. मूळ अभियोग (दावा) हा योग्य असून पक्षकारांना तो सादर करण्याचा अधिकार आहे, असे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर पुन्हा सुनावणी होणार हे निश्चित झाले आहे.
भूमी कोणाची ?
सध्या ज्या भूमीवर इदगाह आहे, ती भूमी कृष्णमंदिराच्या विश्वस्त संस्थेच्या नावाने सरकारमध्ये नोंद आहे. यासंबंधीची महसुली कागदपत्रे उपलब्ध असून ती न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. या भूमीचा कर प्रशासकीय नियमांच्या अनुसार विश्वस्त संस्थेनेच भरला आहे. कर भरल्याची नोंदही महानगरपालिकेकडे आहे. या भूमीवर अन्य कोणतीही संस्था अगर व्यक्ती यांनी स्वामित्व अधिकार सांगितलेला नाही. त्यामुळे ही 13.3 एकर भूमी विश्वस्त संस्थेचीच असून तिचा ताबा विश्वस्त संस्थेकडे देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत आहे.









