शीर्षक वाचून वाचकांना वाटले असेल की हे कसे शक्मय आहे की, एकच व्यक्ती सर्वांची नातेवाईक कशी काय असू शकते किंवा एकाच व्यक्तीशी सर्व नाती कशी असू शकतात? जगात आईचे नाते केवळ आईचेच असू शकते, पित्याचे नाते केवळ पित्याचेच असू शकते, भावाचे नाते केवळ भावाचेच असू शकते, बहिणीशी केवळ बहिणीचेच नाते असू शकते, चुलत्याचे नाते केवळ चुलत्याचेच असू शकते, मग हे कसे शक्मय आहे की ही सर्व नाती एकाच व्यक्तीशी कशी काय असू शकतात? हे समजण्यासाठी आपल्याला भौतिक शरीरापलीकडे असलेल्या आध्यात्मिक स्तरावर जाऊन विचार केला पाहिजे. हे सनातन म्हणजे कधीही न बदलणारे सत्य असल्याने समजून घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक जन्मामध्ये आपली असलेली नाती मृत्युसमयी तुटली जातात पण हे आध्यात्मिक स्तरावर असलेले नाते कधीही तुटत नाही. एवढेच नव्हे तर आपले भगवान श्रीकृष्णाशी असलेले नाते हे सनातन सत्य आहे आणि या जगातील नाती तात्पुरती आहेत जी प्रत्येक जन्मात बदलत जातात. पशु, पक्षी इत्यादी शरीरामध्ये असताना हे समजणे शक्मय नाही कारण आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ नसते पण मनुष्य जन्मामध्ये ही विवेकबुद्धी आपणा प्रत्येकाला भगवंतांनी दिलेली आहे. ही नाती ‘आत्म’ स्तरावर असल्याने ‘आत्मसाक्षात्कारी’ व्यक्तीकडून समजून घेतली पाहिजेत, ज्यांनी ही सर्व नाती जाणून घेतली आहेत आणि आपल्याला समजून देऊ शकतील.
संत तुकाराम महाराज एका प्रसिद्ध अभंगात या नात्यांचे रहस्य उघड करतात. ते सांगतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण बंधू चुलता कृष्ण माझा ।।1।। कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू । उतरी पैलतीरु भवनदीचा ।।2।। कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोयरा सज्जन कृष्ण माझा ।।3।। तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जिवा ।।4।। अर्थात श्रीकृष्ण माझी माता आहे, श्रीकृष्ण माझा पिता आहे, श्रीकृष्ण माझी बहीण, बंधू, चुलता आहे. श्रीकृष्णच माझे गुरु आहेत आणि मला या दुःखमय संसारामधून तारणारे तारू म्हणजे जहाज आहेत. भवनदीच्या पलीकडे घेऊन जाणाराही श्रीकृष्णच आहे, श्रीकृष्णच माझे मन आहे, जन (मित्र) जीवलग मित्रही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण माझा विसावा (विश्रांतीचे ठिकाण) आहे, यामुळे श्रीकृष्णांपासून वेगळे रहावेसे वाटत नाही. हे केवळ भावनिक अथवा तार्किक शब्द नाहीत तर वेदिक शास्त्रावर आधारित स्वानुभवाचे, आत्मसाक्षात्काराचे मार्गदर्शनपर शब्द आहेत. या अभंगाला भगवतगीता आणि भागवत ग्रंथाचा आधार आहे. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण आपल्याला या सनातन नात्याची आठवण करून देतात (भ गी 15.7) ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःष÷ानीन्दियाणि प्रकृतिस्थानि कर्षति अर्थात ‘बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत, बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियाशी संघर्ष करीत आहेत.’ हे सनातन नाते ‘आत्मा’ या आध्यात्मिक शरीर या स्तरावर आधारलेले आहे. आपले सध्याचे शरीर मन आणि पंचतत्वापासून म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश यापासून बनलेले आहे, जे सर्व दुःखाचे कारण आहे. आपण केवळ या पंचतत्त्वापासून बनलेल्या शरीराबद्दल जाणतो जे प्रत्येक जन्मात बदलले जाते पण सर्व शरीरामध्ये भगवान श्रीकृष्णाचे आणि आपले नाते अबाधित राहते आणि ते केवळ मनुष्य शरीरामध्ये आपण जाणू शकतो. पुढे आणखी आपली ओळख देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 9.17) पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः । वेद्यं पवित्रम् ॐकार ऋक् साम यजुरेव च । अर्थात ‘मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. ‘पिता याचा अर्थ आहे सर्व जीवांचे संगोपन करणारा, रक्षण करणारा, माता याचा अर्थ आहे जन्म देणारा. आपल्या पोटामध्ये वाढवणारा, भगवंत सर्व जीवांना पृथ्वीच्या माध्यमातून जन्म देतात आणि त्याचे पोषण करतात, अशाच माध्यमातून मग या जगातील सर्व नाती निर्माण होतात. पण या सर्व नात्यांचे मूळ आहे भगवान श्रीकृष्ण. आपला खरा जन्मदाता किंवा जन्माचे बीज कोण आहे हे सांगताना भगवंत म्हणतात (भ गी 14.4) सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ।अर्थात ‘हे कौंतेय! भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे.’ आपले जन्मदाते माता पिता हे आपल्यासारखेच पंचतत्त्वाचे शरीर असलेले माध्यम आहेत पण प्रकृती आणि बीज स्वरूपात प्रत्यक्ष भगवंतच माता आणि पिता आहेत. हेच तत्त्व गीता समजून घेणारा अर्जुनही मान्य करतो. भगवंताची प्रार्थना करताना तो म्हणतो (भ गी 11.43) पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् । अर्थात ‘तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. सर्वांचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात’ जसे भगवंत या जगताचे पिता आहेत त्याचप्रमाणे सर्वांचे गुरुही आहेत, कारण सर्व ज्ञान त्यांच्यापासूनच येते म्हणून त्यांना आदिगुरु असेही म्हणतात. प्रामाणिक गुरुपरंपरेतून चालत आलेले गुरु केवळ प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेले ज्ञान सर्वांपर्यंत पोचवतात. म्हणून सर्व प्रामाणिक आचार्य ‘कृष्णं वंदे जगद्गुरुं’ असा स्वीकार करतात. तसेच आपले मनही अंशरूपाने कृष्णच आहे (भ गी 10.22) इन्दियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना । अर्थात ‘इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतना मी आहे.’ (भ गी 12.7) तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।अर्थात ‘जे माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा, हे पार्था, मी जन्ममृत्युरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. निष्कर्ष हा की (भा 11.20.17) नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्महा। अर्थात ‘सर्व प्रकारे श्रेयस्कर असणारा हा मानवी देह प्राकृतिक नियमानुसार आपोआप प्रदान केला जात असूनही त्याची प्राप्ती अत्यंत दुर्लभ असते. तो एका उत्तमोत्तम नौकेप्रमाणे असून आध्यात्मिक गुरु त्या नौकेचे कर्णधार आहेत आणि भगवंताचे उपदेश अनुकूल वारे आहेत. हे सर्व लाभ प्राप्त होऊनही जो मनुष्यदेहाचा उपयोग भवसागर तरून जाण्यासाठी करीत नाही, तो स्वतःचा घात करणारा आत्मवैरी होय.’
सर्व जीव हे आत्मस्थितीत भगवंताचे ‘नाते’वाईकच आहेत पण जोपर्यंत आपण शरीरभावनेमध्ये आहोत तोपर्यंत हे ‘सनातन नाते’ समजणे कठीण आहे, यासाठीच भगवंत स्वतः अवतीर्ण होऊन आणि आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून पुनः पुन्हा आपल्याला या ‘सनातन नात्याची’ आठवण करून देतात. मनुष्यजन्मात हे सनातन नाते समजून घेणे आणि त्यानुसार वागणे आवश्यक आहे अन्यथा जेव्हा या नात्याचे आपल्याला विस्मरण होते तेव्हा हे अज्ञानच आपल्या सर्व दुःखाचे कारण असते.
-वृंदावनदास








