शुक्रवारी श्रीकृष्ण जन्म : शनिवारी दहीहंडी साजरी होणार
बेळगाव : शुक्रवार दि. 15 रोजी रात्री 12 च्या घटकेला श्रीकृष्ण मंदिरांतून जन्माष्टमी साजरी होणार आहे. त्या निमित्ताने बाजारपेठेत श्रीकृष्ण, रुक्मिणी, सुभद्रा यांच्या रंगीत मूर्ती दाखल झाल्या असून त्यांची खरेदीही सुरू आहे. अष्टमीच्या निमित्ताने अनेक घरांमध्ये गोकुळाच्या मूर्ती आणल्या जातात. गोकुळ अष्टमीला जन्माष्टमी असेही म्हटले असून हा हिंदूंचा वार्षिक सण आहे. श्रावणमासातील कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला असून श्रीकृष्ण मंदिरांतून जन्माष्टमीचा उत्सव मोठ्याने साजरा होत असतो. अनेक हिंदू घरांमध्ये गोकुळाच्या मूर्ती आणून त्यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने गवळी समाजात हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो.
कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले, ही कथा सर्वश्रुत आहे. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युद्धात पांडवांच्या बाजूने राहून कौरवांचा पराभव केला. या घटनेचे स्मरण म्हणून देशभरात गोकुळ अष्टमीचा सण साजरा होत असतो. शुक्रवार दि. 15 रोजी रात्री जन्माष्टमीचा सण होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी होणार आहे. दहीहंडीला गोपाळकाला असेही म्हटले जाते. जन्माष्टमीच्या निमित्ताने या दिवशी उपवास व रात्री मंदिरांतून जन्मोत्सव व कथा-कीर्तने होत असतात. वैष्णव संप्रदायात हा दिवस विशेष मानला गेला आहे. राम, कृष्ण, विष्णू आणि शंकर ही भारतीयांची दैवते आहेत. श्रीकृष्ण हे त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला व भगवद्गीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत बनले आहे.
दहीहंडी
शहर परिसरात जन्माष्टमीबरोबरच दहीहंडीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात होत असतो. अनेक भागात गोविंदा पथके तयार करून दहीहंडी फोडण्यात येते. गोविंदा पथकांमध्ये बालक व तरुणांचा वेगळा गट तयार करून दहीहंडी कार्यक्रम होत असतो. शनिवारी होणाऱ्या दहीहंडीनिमित्त गोविंदा पथके आतापासूनच तयारीला लागली आहेत.









