वैदिक साहित्याचे संकलक श्रीव्यासदेव यांनी भगवंताच्या अवतारांचे वर्णन अनेक पुराणांमधून केले आहे. त्यात सर्व वेदांचे सार अशा श्रीमद भागवतमध्येसुद्धा भगवंताच्या अवतारांचे वर्णन आहे. या सर्व अवतारांचे मूळ ज्याला अवतारी म्हणतात असे भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, व्यासदेव म्हणतात (भा 1.3.28) एते चंशकला: पुंस: कृष्णस्तु भगवान् स्वयम् । इन्द्रारिव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे? अर्थात ‘हे सर्व भगवंताचे
अंशावतार अथवा कलावतार आहेत, परंतु श्रीकृष्ण हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात, तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी भगवंताचे असे अवतार गृहलोकातून प्रकट होतात.’ या संदर्भात स्वत: श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात (भगी4.7-8)
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
अर्थात ‘जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता, मी स्वत: अवतीर्ण होतो.’ परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे । अर्थात ‘भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वत: युगायुगात प्रकट होतो’ भागवत धर्माची तत्त्वे गीता-भागवत या ग्रंथामधून सांगण्यात आली आहेत. आणि याचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. भागवत मध्ये सांगितले आहे (भा 6.3.19) धर्मं तु साक्षाद्भगवत्प्रणीतं अर्थात धर्मतत्त्व म्हणजे श्रीभगवान यांच्या आज्ञाच आहेत. या तत्त्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवत् गीतेत करण्यात आले आहे. भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्त्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वत:च आज्ञा देतात की, भगवंतांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्य धर्मतत्त्व नाही. वैदिक तत्त्वे मनुष्याला, भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यास प्रवृत्त करतात आणि अशा तत्त्वांमध्ये जेव्हा आसुरी वृत्तीचे लोक विघ्ने आणतात, तेव्हा भगवंत अवतार धारण करतात.
भागवत ग्रंथामधून आपल्याला कळून येते की भगवान बुद्ध हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणाचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा बुद्धदेव अवतीर्ण झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूंकरिता जरी पशुयज्ञसंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी जे असुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांताना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्त्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन भागवत, पद्मपुराण, विष्णुपुराण यासारख्या धर्मग्रंथात करण्यात आले आहे. यावरून समजून घेतले पाहिजे की जोपर्यंत धर्मशास्त्रात एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणालाही अवतार म्हणून स्वीकारू नये.
भगवान श्रीकृष्ण त्यांच्या इच्छेनुसार केव्हाही आणि कुठेही अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवद् भावनायुक्त होण्यास आणि धर्म-तत्त्वांचे पालन कारण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वत: अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला, आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वत:च प्रकट होतात. अशा निरनिराळ्या अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकविले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. भगवान बुद्धांचे अवतार आणि कार्य याबद्दल त्यांच्या अवताराअगोदरच हजारो वर्षे आधी त्यांचा भागवत ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्यात वर्णन येते (भा 1.3.24) तत: कलौ सम्प्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम् । बुद्धो नाम्नाञ्जनसुत: कीकटेषु भविष्यति अर्थात ‘त्यानंतर कलियुगाच्या आरंभी भगवान, देवतांचा द्वेष करणाऱ्यांना मोहित करण्यासाठी अंजनाच्या बुद्ध नामक पुत्राच्या रूपाने बिहार प्रांतात प्रकट होतील’ भगवंताचे शक्तिशाली अवतार भगवान बुद्ध बिहारमधील गया प्रांतात अंजनेचे पुत्र म्हणून प्रकट झाले. त्यांनी स्वत:च्या धारणेप्रमाणे अहिंसेचा प्रचार केला आणि वेदांनी मान्य केलेल्या पशुहत्येचे खंडन केले. भगवान बुद्ध प्रकट झाले तेव्हा सामान्य जन नास्तिक झाले होते, आणि इतर वस्तूपेक्षा प्राण्याचे मांसच अधिक भक्षण करू लागले. वैदिक यज्ञकर्माच्या नावावर प्रत्येक स्थान कत्तलखानाच झाले होते. पशूंची हिंसा अनिर्बंधपणे चाललेली होती. निष्पाप प्राण्यांची दया येऊन भगवान बुद्धांनी अहिंसेचा प्रचार केला. बुद्धदेवांनी सांगितले की, वेदातील सिद्धांतावर आपला विश्वास नाही. तसेच पशुहत्येमुळे मनोवैज्ञानिक दुष्परिणाम कसे होतात यावर त्यांनी जोर दिला. भगवंतावर विश्वास नसलेल्या कलियुगातील मंदबुद्धीच्या लोकांनी त्यांची तत्त्वे स्वीकारली. काही काळापर्यंत त्यांनी लोकांना नैतिक शिस्त आणि अहिंसा यांची शिकवण दिली. कारण परमेश्वराचा साक्षात्कार करण्याच्या मार्गावर ही तत्त्वे
प्राथमिक पावले होती. त्यांनी नास्तिकांना मोहित केले, कारण त्यांची तत्त्वे पालन करणारे नास्तिक भगवंतावर विश्वास ठेवत नव्हते, परंतु नास्तिकांनी भगवान बुद्धांवर आपला पूर्ण विश्वास ठेवला होता आणि बुद्ध स्वत: भगवंताचे अवतार होते. अशा रीतीने परमेश्वरावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना, त्यांनी आपल्या रूपाने भगवंतावर विश्वास ठेवायला भाग पडले. त्यांनी अंधश्रद्धाळूंना स्वत:बाबत श्रद्धाळू बनविले, ही त्यांची कृपा होती.
भगवान बुद्धांच्या आगमनापूर्वी पशुहिंसा हे समाजाचे अत्यंत ठळक असे प्रमुख अंग मानले जाई. लोकांच्या मते पशुहिंसा म्हणजे वैदिक यज्ञच होते. त्यांना कर्मकांडात्मक कार्यभाग म्हणजेच सर्व काही आहे असे वाटते. दुर्दैवाने, वेदांचे अनधिकारी अभ्यासक शुद्धीकरण-प्रक्रियेच्या रूपातील संस्कारांवर आसक्त होतात आणि त्या कारणाने स्वाभाविक प्रगती खंडित होते. नास्तिक प्रवृत्तीने भ्रमित झालेल्या अशा लोकांना भगवान बुद्ध हे आस्तिकतेचे प्रतीक आहेत. म्हणून सर्वप्रथम, पशुहत्येला प्रतिबंध करण्याची त्यांची इच्छा होती. लोकांना परमार्थाच्या मार्गावर जाण्याचे शिक्षण द्यावयाचे असेल तर त्यांना सर्वप्रथम पशुहत्येची पद्धती बंद करण्यास शिकविले पाहिजे. पशुहत्येचा आणि आध्यात्मिक मार्गाचा काही संबंध नाही, असे जर कोणी म्हणत असेल तर ते निरर्थक आहे. भगवान बुद्धांनी वरवर वेदांचा अधिकार अमान्य केला. त्यांचे इतरही हेतू होते. त्यांना पशुहिंसेसारख्या दुर्गुणांपासून लोकांना वाचवायचे होते. तसेच विश्वबंधुत्व, शांती, समता, न्याय यासाठी आरडाओरडा करणाऱ्या पशुंच्याच मोठ्या बांधवाच्या हातून होत असलेल्या पशुहिंसेच्या कृत्यापासून निष्पाप प्राण्यांचे संरक्षण करावयाचे होते. जोपर्यंत पशुहत्या चालते, तोपर्यंत न्यायाचा प्रश्नच नसतो. भगवान बुद्धांना हे पूर्णपणे थांबवायचे होते. म्हणून त्यांच्या अहिंसा सिद्धांताचा प्रचार केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही झाला. बाराव्या शतकातील संस्कृत कवी आणि सुप्रसिद्ध कृष्णभक्त जयदेव गोस्वामी यांनी आपल्या गीतगोविंद ग्रंथामधील दशावतार स्तोत्र मध्ये भगवान बुद्ध अवताराचा गौरव करताना म्हटले आहे निन्दसि यज्ञविधेरहह श्रुतिजातम । सदयह्रदयदर्शितपशुघातम्। केशव धृतबुद्धशरीर जय जगदीश हरे ।। अर्थात हे केशव ! हे बुद्ध शरीरधारी ! जगदीश! हे पाखंड हरण करणारे, हरे आपला जय असो, कारण आपले अंत:करण दयायुक्त आहे आणि अहिंसेला परम धर्म मानणारे आहे, तसेच तुम्ही हिंसात्मक पशुहत्येचे प्रदर्शन करणाऱ्या यज्ञविधीच्या श्रुतीतत्त्वांची निंदा करणारे आहात. अहिंसेवर भागवत धर्माचा मोठा भर आहे. हिंसा करणाऱ्याच्या हृदयात दयाभाव असूच शकत नाही. कधी कधी धर्माच्या नावाखाली देवी-देवतांचा तथाकथित नवस फेडण्यासाठी अथवा स्वत:च्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पशूंची हत्या करणाऱ्यांना भगवान बुद्धाप्रमाणेच तुकाराम महाराज सावध करताना म्हणतात.
आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाही ।।1।। करिती बेटे उसणवारी यमपुरी भोगावया।।2।। सेंदराचे दैवत केले । नवस बोले तयासी ।।3।। तुका म्हणे नाचती पोरे । खोडिता येरे अंग दुखे ।।4।। अर्थात ‘काही दुष्ट लोक इतरांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपणास सीमाच असत नाही. हे दुष्ट लोक नरकवास भोगण्यासाठी ही उसनवारी करीत आहेत. शेंदूर किंवा कुंकू फासून त्याला नवस बोलून त्यांच्यापुढे कोंबडी, बकरी इत्यादी पशूंची हत्या करणे याला निष्ठुर लोक देवपूजा समजतात. तुकाराम महाराज म्हणतात, ही माणसे देवाच्या नावाने नाचतात, यांना दोष दाखविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अंग दुखल्याइतके दु:ख होते.
जगामध्ये भगवान बुद्धांच्या अहिंसा आंदोलनात गोडी वाढत आहे, परंतु प्रश्न असा आहे की ते लोक या अहिंसा तत्त्वाचा गांभीर्याने विचार करतील काय? जर तसे होत नसेल, तर अहिंसेच्या तत्त्वप्रणालीला काहीच अर्थ रहात नाही. भगवान बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त याचा सर्वानी जरूर विचार करावा.
वृंदावनदास








