दुचाकीस्वार भामट्यांकडून ट्रकचालकांची लुबाडणूक : खंडणीसाठी पोलीस स्थानकाची धमकी
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकतीजवळ वाहनचालकांना अडवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. लुटीसाठी दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहून गैरफायदा घेतला जात आहे. रात्रीच्या अंधारात हे प्रकार सुरू असून पत्रकार असल्याचे सांगत लुटणाऱ्या या टोळीच्या उपद्व्यापाला वाहनचालक कंटाळले आहेत.
महामार्गावरून ये-जा करणारी वाहने काकती व होनगा दरम्यान अडवून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. जर कागदपत्रे व्यवस्थित नसतील तर खंडणी मागितली जात आहे. खंडणी देण्यास नकार देणाऱ्यांना पोलीस स्थानकात नेऊन हिसका दाखवतो, असे धमकाविण्यात येत आहे. आठवडाभरात दोनहून अधिक घटना घडल्या असून पोलिसांनी वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
यापूर्वी कित्तूरपासून निपाणीपर्यंत वाहने अडवून कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करणाऱ्या अनेक गुन्हेगारांविरुद्ध कित्तूर, हिरेबागेवाडी, यमकनमर्डी, निपाणी आदी वेगवेगळ्या पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाले आहेत. खासकरून रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करणारी वाहने अडवून त्यांना लुटण्यात येत होते.
आता काकती ते होनगा दरम्यान पुन्हा असे प्रकार वाढीस लागले आहेत. दर्शनी भागावर ‘प्रेस’ असे लिहिलेल्या मोटारसायकलवरून दोघेजण येतात. या मार्गावरून ये-जा करणारी वाहने अडवितात. वाहनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली जाते. तपासणीच्या नावाखाली मोठी रक्कम मागितली जाते. नहून पोलीस स्थानकात नेऊन अडकविण्याची धमकी दिली जाते. मंगळवार दि. 22 ऑगस्ट रोजी रात्री एका ट्रकचालकाला लुटल्याची घटना घडली आहे.
तोतया पत्रकारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी
वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना आहे. मात्र, प्रेसच्या नावे वाहनांची तपासणी करीत वाहनचालकांना लुटण्यात येत असून या टोळीतील गुन्हेगारांनी वाहनचालकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. मध्यंतरी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सरकारी कार्यालये व महामार्गावर अडवणूक करून ‘प्रेस’च्या नावे लुटमारीत गुंतलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता काकती पोलिसांनी या तोतया पत्रकारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे.









