भामट्यांनी सावर्डेनजीक चेन ओढून रेल्वे थांबविली, लूट झालेले तरुण मध्यप्रदेशचे
बेळगाव : चॉकलेट व चिप्समधून गुंगीचे औषध देऊन मध्यप्रदेशमधील आठ तरुणांना हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये लुटण्यात आले होते. सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला होता. ही संपूर्ण घटना गोव्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्या सर्व आठ तरुणांची प्रकृती सुधारली असून गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सर्व तरुण शुद्धीवर आल्यानंतर राजसिंग लक्ष्मीप्रसाद खंगार (वय 19) रा. लरखास, टिकामनगर, मध्यप्रदेश या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राजसिंगबरोबरच पुष्पेंद्र रामकिशोर रजक (वय 19) रा. लरखास, टिकामनगर, कृष्णा मन्साराम (वय 18), ओमप्रकाश मुन्शी (वय 18), अजय प्रताप पालवी (वय 23), आकाश श्रवण पालवी (वय 18), शिवा चोगेलाल पालवी (वय 18), विकास श्रवण पालवी (वय 21) सर्व रा. शिरवा, जि. खांडवा, मध्यप्रदेश अशी शुद्धीवर आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण मोलमजुरीसाठी गोव्याला गेले होते. शुद्धीवर आल्यानंतर या तरुणांनी रेल्वेत कशा पद्धतीने आपली लूट झाली, याची रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे. गावाला जाण्यासाठी हे सर्वजण सोमवारी वास्को रेल्वेस्थानकावर पोहोचले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील जनरल बोगीत बसले. रेल्वे सुटल्यानंतर थोड्याच वेळात या तरुणांजवळ चौघे भामटे आले. त्यांनी या तरुणांची ओळख विचारली. आपणही मध्यप्रदेशलाच जात असल्याचे सांगितले. मडगाव रेल्वेस्थानक येण्याआधी भामट्यांनी या तरुणांना खाण्यासाठी चॉकलेट व चिप्स दिले. खाण्यास नकार देऊनही आग्रह करून त्यांना खाण्यासाठी भाग पाडण्यात आले. चॉकलेट व चिप्स खाल्ल्यानंतर त्यांना गुंगी चढली. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. सावर्डेजवळ चेन ओढून रेल्वे थांबवून चौघा भामट्यांनी तेथून पलायन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
लाखाचा ऐवज पळविला
पलायन करण्यापूर्वी भामट्यांनी या तरुणांच्या खिशातील सात मोबाईल संच, सुमारे 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण लाखाचा ऐवज पळविला आहे. वरखर्चासाठी प्रत्येक तरुणाने 3 ते 5 हजार रुपये आपल्या खिशात ठेवले होते. भामट्यांनी ही रक्कम पळविली आहे. जनरल बोगीत आठजण झोपल्याचे रेल्वेसुरक्षा दलाच्या जवानांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणांना उठविण्याचा प्रयत्न केला. यापैकी कोणीही उठले नाही. हे सर्वजण गुंगीत होते. त्यामुळे संशय येऊन बेळगाव रेल्वेस्थानकावर या सर्व तरुणांना उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता ते तरुण शुद्धीवर आले असून गुरुवारी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.









