खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शिक्षकाकडून भरपाईची रक्कम वसूल करण्याचे आदेश
बेळगाव : खोटे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करून समाज कल्याण खात्याकडून लाखो रुपयांची भरपाई मिळविणाऱ्या एका शिक्षकाला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील खंडपीठाने चांगलेच धारेवर धरले आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्याने मिळविलेली भरपाई वसूल करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी हा आदेश दिला असून अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांसाठी हा निकाल एक इशाराच ठरला आहे. बागलकोट जिल्ह्यातील मुगनूर येथील एका मुख्याध्यापकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्या चंद्रू राठोड या शिक्षकाला न्यायालयाने धारेवर धरले आहे. अर्जदार मुख्याध्यापकांच्यावतीने अॅड. अविनाश अंगडी यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. मुख्याध्यापक शिवलिंगाप्पा केरकलमट्टी यांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी चंद्रू राठोड या शिक्षकाने त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. शिक्षकाने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याविरोधात मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. ही फिर्यादच खोटी असल्याचे अॅड. अविनाश अंगडी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर समाज कल्याण खात्याकडून चंद्रू राठोडला भरपाईची रक्कम मिळाली होती. सरकारने त्याला दीड लाख रुपये भरपाई दिली होती. भरपाईची रक्कम संबंधित शिक्षकाकडून वसूल करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या शिक्षकाने अनेक पोलीस स्थानकांत अनेक जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केले आहेत.
प्रत्येकवेळी ठरावीक तिघा जणांचा साक्षीदार म्हणून वापर
अर्जदारांनी यासंबंधी न्यायालयाचे लक्ष वेधले. प्रत्येकवेळी ठरावीक तिघा जणांचा साक्षीदार म्हणून वापर करण्यात आला आहे, ही बाबही न्यायालयाच्या नजरेस आणून दिली. त्यामुळे न्यायालयाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या चंद्रू राठोडची चांगलीच खरडपट्टी काढली व भरपाईची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्याचा आदेश दिला आहे.









