उसगावात महिलेचा गळा, तोंड दाबून धाडसी चोरी : चार लाखांच्या मंगळसूत्रासह पाच लाख लुटले
फोंडा : दाण्यार-पालवाडा, उसगांव येथे एका फार्महाऊसातील घरात अज्ञात बुरखाधारी चोरटयांनी पहाटे 3.30 वा. सुमारास घरात प्रवेश करुन महिलेच्या अंगावरील सुमारे 4 लाख रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व दावल हिसकावले. तिचा गळा आवळून, तोंड दाबून दमदाटी करून कपाटातील रोख 75 हजार रूपये लांबवून अवघ्या अर्धा तासात घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना मंगळवार 2 सप्टे. रोजी पहाटे उघडकीस आली. उसगांव भागात चोरटे घरात घुसून महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढू लागल्यामुळे येथील गृहिणी व महिलांनी धास्ती घेतली आहे. फोंडा पोलिस रात्री गस्त घालतात की झोपा काढतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्राप्त माहितीनुसार चोरांनी प्रवेश केला त्यावेळी शितल रामा गावडे ही घरात एकटीच होती. तिचा पती रामा हा मासळी व्यवसायिक असून तो व त्याचा भाऊ अन्य एक कामगारासह पहाटे 3 वा. सुमारास मडगांव येथील होलसेल मार्केटमधून मासळी आणण्यासाठी बाहेर पडले होते. नेहमीप्रमाणे घरातील माणसांना आतमध्ये ठेवून रामा मुख्य दरवाजाला कुलुप ठोकून बाहेर पडला होता. चोरांनी या घराची रेकी तसेच रामा या व्यवसायिकाकडे रोख पैसे असतात याची शहानिशा केल्यानंतरच हा डाव साधलेला आहे. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी तातडीने घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ञांसह भेट दिली. या फार्महाऊसमधील घराकडे पोचण्यासाठी आडमार्गाने दोन वाटा असून मुख्य रस्त्याचा अवलंब चोरटयांनी केला नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झालेले आहे.
नेमक्या घटनेच्या दिवशी रामा याची आई घरी नव्हती. गणपती दर्शनासाठी आपल्या मुलीकडे गेली होती. त्यामुळे सून एकटीच घरी होती. डोके दुखत असल्यामुळे पती मडगांव येथे गेल्यानंतर ती घरीच झोपी गेली होती. एरवी पत्नी घरी एकटी असल्यास रामा तिला मासळी आणण्यासाठी जाताना बेतोडा येथे माहेरी सोडून मडगांव येथे जात असे. नेमक्या घटनेच्या दिवशी रामा याची पत्नी घरी थांबल्यामुळे अंगावरील मंगळसूत्र व दागिने चोरांच्या हातात सापडले. चोरटयांनी गळा आवळल्यानंतर शितलने प्रतिकार करताना चोरटयाच्या हाताचा चावा घेतला. तसेच हाताला मिळालेला थर्मास चोरटयाच्या डोक्यावर घालून आपली तात्पुरती सुटका करून घेतली. लगेच बेशुद्धावस्थेत ती जमिनीवर कोसळली. त्यावेळी चोरटे चक्क कोकणी भाषेत बोलत होते, तसेच शरीरयष्टी सडपातळ असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली असून दागिने व रोकड लांबविल्यानंतर काही क्षणात त्यानी पळ काढला.
महिलेने पतीला फोन लावला, चोरटे लाथा मारून बेडरूमात शिरले
चोरटयांनी मुख्य दरवाजाला कुलुप असल्याचे पाहिल्यानंतर रामाचा भाऊ राहत असलेल्या बाहेरच्या खोलीतील कपाटातून सुमारे रू. 15 हजारांची रोकड लांबविली. घरात कोणी प्रवेश केल्याचा सुगावा लागताच शितलने आपल्या पतीला मोबाईलवर फोन लावला. तेव्हा ते मडगांव होलसेल मार्केट येथे पोचले होते. मोबाईल सुरू असतानाच चोरटयांनी पाठीमागील खिडकीच्या ग्रीलमधून घरात प्रवेश केला. ती फोनवर पतीला माहिती देईपर्यंत बेडरूमच्या खोलीवर लाथा मारून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बुरखाधारी चोरटयांपैकी एका चोरटयाने तिचे तोंड दाबले, गळा आवळला व गळ्यातील मंगळसूत्र व दाऊल हिसकावून घेतले. कपाटातील रोख रू. 60 हजारांची रोकड लांबवून घटनास्थळावरून पाठीमागील दार उघडून पळ काढला. तातडीने रामा यांने आपल्या मित्राला पालवाडा येथील रस्त्यावर पाळत ठेवण्यासाठी तैनात केले होते. मात्र या रस्त्यावरून कुणीच फिरकला नाही. त्यामुळे चोरटयांनी पूर्व नियोजित आडवाटेने आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहाटे 3 वा. टिपलेल्या छायाचित्रात दिसत आहे. उसगांव भागात वाढत्dया चोऱ्याचा छडा लावणे हे फोंडा पोलिसाना मोठे आव्हान आहे.
मेरशीत दहा लाखांचे दागिने लंपास,मेरशीत राहणाऱ्या कुडाळच्या चोरट्याने केली धाडसी चोरी
कुडाळ (महाराष्ट्र) येथील एका चोरट्याने पेरीभाट-मेरशी येथील बंद फ्लॅटला लक्ष्य करीत फ्लॅटमध्ये धाडसी चोरी केली. चोरट्याने सुमारे 10 लाख ऊपयांच्या मौल्यव्यान वस्तू लांबवल्या. ही घटना 28 ऑगस्ट रोजी घडली होती. गणेशोत्सवाचा फायदा घेत संशयित चोरट्याने ही जबरी चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरीभाट-मेरशी येथे पूजा राजेंद्र माणगावकर यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्याने 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते मध्यरात्री 2.15च्या सुमारास प्रवेश केला. चोरट्याने खिडकीच्या दरवाजातून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने सोने आणि चांदीचे दागिने चोरले. चोरीच्या वस्तूंमध्ये 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे, 2 ग्रॅम वजनाचे कानातले, एक नाकाची पिन, 40 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 40 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, 2 ग्रॅम वजनाचे कानातले, 4 ग्रॅम वजनाच्या अंगठी आणि पायातील पैंजण आणि एडो यांचा समावेश होता. चोरी झालेल्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 10 लाख ऊपये इतकी आहे. या चोरीची तक्रार पूजा माणगावकर यांनी जुने गोवे पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 331(3), 331(4), आणि 305 अंतर्गत गुन्हा क्रमांक 111/2025 गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा केला. संशयित चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून, संशयिताने फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीच्या तपासाला सीसीटीव्हीचा आधार
पोलिसांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून एक संशयास्पद व्यक्ती काळ्या आणि लाल रंगाच्या स्कूटरवरून परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. आरोपी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने सीसीटीव्हीचा आधार घेऊन मेरशी परिसरात संशयित आरोपी व्यक्तीचा पाठलाग करून त्याला एमएच-07 एएल-7541 या क्रमांकाच्या दुचाकीसह अटक केली. अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर असे संशयित चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा माथुवाडा, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील असून, तो एन बी रायकर अपार्टमेंट, ब्लॉक सी फ्लॅट क्रमांक एफएफएल 1, पेरीभाट -मेरशी येथे राहत असल्याचे उघड झाले आहे.









