सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा
संतोष सावंत , सावंतवाडी
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. गेले काही दिवस या ब्लड बँक मध्ये फक्त एकच महिला अधिकारी कार्यरत आहे. ही ब्लड बँक दर दिवशी जवळपास शंभर ते दीडशे रुग्णांची रक्त तपासणी करत आहे. रक्त तपासणीसाठी सकाळी साडे आठ वाजल्यापासूनच रुग्णांची गर्दी असते. सध्या ही ब्लड बँक शिकाऊ कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच सुरूआहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय म्हणजे जणू जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाप्रमाणेच सावंतवाडी विधानसभा भागातील सावंतवाडी, दोडामार्ग ,वेंगुर्ले तसेच कुडाळ, माणगाव भागातील रुग्ण या रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात . त्यामुळे हे रुग्णालय म्हणजे जणू जिल्हा रुग्णालय असल्यासारखीच स्थिती नेहमीच असते. पण या रुग्णालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक गैरसोयींना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्यावर, फक्त मी हे करणार, मी ते करणार आणि प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाहीत . असे नागरिकांचे नेहमीच म्हणणे असते . गेली कित्येक वर्ष या रुग्णालयाची स्थिती आणि या ब्लड बँक मधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण फक्त मंत्री, लोकप्रतिनिधी ,राजकारण्यांच्या आश्वासनावरच आज या ब्लड बँकेची स्थिती सुधारेल, उद्या सुधारेल या आशेवरच आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ही ब्लड बँक सर्व सोयींनी युक्त आहे. या ब्लड बँक मध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी कोरोना काळात काही मशिनरी उपलब्ध करून दिले आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी मनुष्यबळाची गरज अत्यंत आवश्यक आहे. या ब्लड बँक मध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या भरून काढण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दोन वजनदार मंत्री असताना अशी अवस्था का ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.









