अध्याय एकतिसावा
नाथमहाराज म्हणाले, भगवंत निजधामाला जाणार हे समजल्यावर त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व देव एकत्र जमा झाले. त्या सर्वांना पाहून भगवंतांनी त्यांचे डोळे झाकून घेतले. आपल्याला पाहून भगवंतांनी डोळे का झाकून घेतले हाच प्रश्न सर्व देवगणांना पडला होता. ह्या प्रश्नाचे उत्तर असे की, मागे एकदा श्रीकृष्णनाथ द्वारकेत असताना सर्व देवगण तेथे येऊन त्यांना विनंती करून गेले होते की, आता अवतारकार्य संपवा. तसेच निजधामाकडे जाताना आम्हा सर्वांच्या घरी आवश्य या. त्यावर निजधामाला जाताना मी तुमची इच्छा पूर्ण करीन असे श्रीकृष्णांनी मान्य केले. त्यामुळे आपण कुणीतरी महान आहोत, असा अहंभाव देवगणांना झाला होता. हा त्यांचा अहंभाव नष्ट करण्यासाठी श्रीहरींनी आपले डोळे झाकून आपण समाधीत आहोत असे देवांना भासवले. कलीकाळाला जिंकलेल्या योगीजनांना स्वेच्छामरण घेता येते. स्वेच्छामरण घेऊन ते स्वत: अग्निकाष्ठे भक्षण करतात आणि स्वत:चा देह अग्नीला अर्पण करून परब्रम्हात विलीन होतात. सगुणाने निर्गुणत्व स्वीकारले की, घट्ट तूप पातळ होऊन विखुरल्यावर सर्वत्र पसरते तसे सगुणत्व निर्गुण होऊन सर्वव्यापी होते. मात्र श्रीकृष्णांना काही तसे करायची गरज नव्हती कारण त्यांनी धारण केलेले सगुण रूप ही त्यांचीच लीला होती. त्यामुळे योगाग्निधारण करून भगवंत स्वदेहाचा नाश करतील हे कदापि शक्य नव्हते. कृष्णस्वरूप मुळातच परिपूर्ण असल्याने त्यांना योगधारणा करण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचे देह धारण करणे हीच एक लीला होती. त्या लीलेतून धारण केलेला देह मायिक होता आणि माया ही त्यांच्या नजरेखाली काम करते. त्यांच्या देहाचे अस्तित्व तात्पुरते होते. ते त्यांनीच संपवून टाकायचे ठरवल्यावर दहन तरी कशाचे करणार? अर्थातच ही गोष्ट केवळ त्यांनाच माहित होती. ते निजधामाला जाताना काय काय होणार आहे ह्याचा तर्क शिवादिकही करू शकत नव्हते. पुढे नाथमहाराज श्रीकृष्णाच्या सगुण रूपाचे वर्णन करत आहेत. ते म्हणतात, त्यांच्या मूर्तीकडे बघितलं की, मनुष्य मंत्रमुग्ध होत असल्याने, त्याचे ध्यान लागून राहते. श्रीकृष्णांचे सौंदर्य परिपूर्ण असल्याने त्यांची सर्व जगाला मोहिनी पडते. त्यांचे देखणेपण पाहून मदनाचा पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागे. त्यांच्या चरणांचे सौंदर्य असे की, ते बघून साक्षात लक्ष्मीला त्यांची भुरळ पडली. योगी तर सदैव त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करत असल्याने त्यांचे ध्यान सदैव लागून राहते. शिवादिक त्यांचे नित्य चिंतन करत असतात. सर्व मंगल गोष्टींचे माहेरघर असलेले चैतन्यघन श्रीकृष्ण स्वत: आत्माराम असून त्यांच्यामुळे जगाला संतुष्टी मिळते. स्वत:च्या लीलेने श्रीकृष्ण ध्यानगम्य चिद्रूप होतात. ज्याप्रमाणे थंड वातावरणामुळे पातळ असलेले तूप थिजून घट्ट होऊन राहते त्याप्रमाणे स्वलीलेने त्यांनी अवतार घेतला आणि चैतन्यपूर्ण असलेले श्रीकृष्ण सगुण रुपात अवतरले. ह्या अवतारात त्यांनी प्रत्यक्ष दावाग्निचे सेवन केले, कालियाचे विष अंगात भिनू दिले नाही. अर्थात हे सर्व त्यांना शक्य झाले कारण ते देहात आहेत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एक नाटकच होते.
प्रत्यक्षात देहच धारण केलेला नसल्याने त्याला मरण कशाचे येणार? भक्तीने प्रसन्न होणारे श्रीकृष्ण भक्ताच्या हृदयात आपणहून प्रकटतात आणि ज्या भक्ताच्या बाबतीत हे घडतं तोही देही असून विदेही होतो. दुसऱ्याला तो देही असून विदेही अवस्था प्राप्त करून देण्याइतकी ताकद ज्यांच्या अस्तित्वात असते त्यांच्या ठिकाणी देहत्व असेलच कसे? त्यामुळे श्रीकृष्णांचा नाश झालाच नाही. त्यांचा देह नाहीसा झाला हा केवळ आभास होय. ज्याप्रमाणे आरशासमोरून माणूस हलला की, त्याचे त्यात दिसणारे प्रतिबिंब नाहीसे होते. तरीपण प्रत्यक्षात तो माणूस असतोच.
क्रमश:








