मूर्तिशाळांमध्ये लगबग : लहान मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आल्याने मूर्तिशाळांमध्ये लगबग सुरू आहे. दिवस-रात्र मेहनत करून मूर्तिकार मूर्ती घडवू लागले आहेत. लहान मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली आहे.
मागील दोन वर्षांत कोरोना निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र, यावषी निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येईल तसे तयारीला वेग येत आहे. घरगुती गणेशमूर्ती तयार करून त्या विक्रीला ठेवण्यासाठी मूर्तिकारांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रंगकाम पूर्ण होत आले असून शेवटचा हात फिरविला जात आहे.
बेळगाव शहर व परिसरात गणेशमूर्ती घडविणारे अनेक मूर्तिकार आहेत. त्यामुळे रात्रंदिवस मूर्तिशाळांमध्ये लगबग सुरू आहे. लहान मूर्तींचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्तींचे काम करणार आहेत. बेळगावमधील मूर्तींसोबत कोल्हापूर, पेण या भागातूनही गणेशमूर्ती बेळगावमध्ये दाखल झाल्या आहेत. ठिकठिकाणी त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.









