भातकापणी हाती घेताच वारंवार येतेय पावसाचे विघ्न
प्रतिनिधी/ रत्नागिरी
परतीच्या पावसाचा मुक्काम दिवसागणिक लांबत आहे. शनिवार, रविवारी चांगली उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाचे सावट दाटलेले आहे. हवामान विभागाने कोकण विभागात 12 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील शेतकऱयांसमोर ऐन भातकापणीच्या हंगामात मोठा पेच निर्माण झाला आहे.
या हंगामातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ झाल्याचे यापूर्वीच हवामान विभागाने स्पष्ट केले होते. पण वारंवार हवामानात होणारे बदल पावसाला पुन्हा पुन्हा पोषक स्थिती निर्माण करत आहेत. यामुळे कोकणातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. आता तर भातशेती पूर्ण कापणीलायक झालेली आहे. हळवी भातशेती लांबलेल्या पावसामुळे मोठय़ा संकटात सापडली आहे.
नवरात्रौत्सवात दसऱयाच्या मुहूर्तावर जिल्ह्य़ात 3 दिवस पावसाने जोरदार वृष्टी केली. यामुळे भात कापणीची कामे लांबणीवर पडली. त्यानंतर काही दिवस लख्ख उन पडल्याने शेतकरी भात कापणीच्या तयारीला लागला होतो. मात्र ढगाळ वातावरण आणि अधून मधून कोसळणाऱया पावासाने शेतकऱयांच्या चिंतेत भर पहत आहे.
हवामान विभागाने 13 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात 12 ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ असून 13 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित आहे. मात्र 15 ऑक्टोबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









