भारताशी आहे याचे कनेक्शन : ऑस्ट्रेलिया अन् कॅनडातही हेच चित्र
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात तांदुळ खरेदीसाठी लोक लांब रांगांमध्ये उभे असल्याचे दिसून येते. या देशांमध्ये राहत असलेले अनिवासी भारतीय, आफ्रिकन नागरिक मोठ्या संख्येत तांदळाची खरेदी करत घरात त्याचा साठा करत आहेत. आगामी काळात तांदळाच्या किमतीत वाढ होण्यासह टंचाईला सामोरे जावे लागू शकते अशी भीती त्यांना आहे.
सोशल मीडियावर रिटेल स्टोअर्समधील लोकांच्या लांब रांगांचे व्हिडिओ अन् छायाचित्रे व्हायरल होत आहेत. या देशांमधील रिटेल स्टोअर्सनी या संधीचा लाभ घेत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. आशियाई आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी भातच भोजनातील प्रमुख घटक आहे.
भारताकडून निर्यातबंदी
20 जुलै रोजी भारत सरकारने बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. 40 टक्के जागतिक निर्यातीवर भारताचा कब्जा आहे. परंतु देशांतर्गत बाजारपेठेतील वाढत्या किमती आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात ठेवू पाहणाऱ्या मोदी सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांमधील अनिवासी भारतीय आणि आफ्रिकन वंशाचे नागरिक तांदूळ खरेदी करत त्याचा साठा करत आहेत. भारताच्या बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीच्या निर्णयामुळे जागतिक बाजरात तांदळाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तांदळाच्या किमतीतील वाढ आतापासूनच दिसू लागली आहे.
उत्पादनात घट होण्याची शक्यता
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर पुरवठा समस्यांमुळे जागतिक अन्नधान्य संकट दिसून आले होते. तेव्हा गव्हाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, तर खाद्यतेलही महागले होते. त्यावेळी देखील भारताने देशांतर्गत बाजारपेठेत किमतीवर नियंत्रण राखण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. चालू वर्षात जगभरात अल नीनोच्या प्रभावामुळे तांदळाच्या उत्पादनावर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत किमती आणखी वाढू शकतात.
आयएमएफची भारताला विनंती
जागतिक अन्नसंकट पाहता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ञ पियरे-ओलिवियर यांनी भारताला निर्यातबंदी हटविण्याची विनंती केली आहे. भारताच्या या निर्णयामुळे जगभरात संकट उभे राहू शकते. अशाप्रकारच्या बंदीमुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. भारत सरकारच्या बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदीच्या निर्णयाचा प्रभाव एकूण 25 टक्के निर्यातीवर पडू शकतो.