कोल्हापूर :
एक डुलकी एक अपघात असे परिवहन कार्यालयाचे घोषवाक्य आहे. यामुळे रात्री असो किंवा दिवसाचा प्रवास, वाहन चालवताना झोप आल्यास वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन काही वेळ विश्रांती घेणे हा पुढील दुर्घटना टाळण्याचा मार्ग आहे. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्यानेही अपघात होतात.रविवारी रात्री कांडगाव येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने आराम बसचा अपघात झाला.यामुळे रात्री वाहन चालवताना चालकाने सावधगिरी बाळगली पाहिजे असा परिवहन विभागाचा सल्ला आहे.
रविवारी रात्री उशिरा करवीर तालुक्यातील कांडगाव येथे खासगी आराम बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर अन्य प्रवासी जखमी झाले.या अपघातामुळे बसेसच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.सद्या रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरु आहेत.यामुळे चालकांना वाहन चालवताना या रस्त्यांचा अंदाज येत नाही. यामुळेही अपघाताची संख्या वाढली आहे.त्यातही रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. रस्त्यांची कामे आणि चालकाच्या झोपेमुळे हे अपघात होतात.तसेच महामार्ग तसेच घाटामध्ये ब्लॅक स्पॉट आहेत. परिवहन विभाग, रस्ते विकास महामंडळांने असे ब्लॅक स्पॉट निश्चित करुन त्यावर काम केले जात आहे. तरीही अन्य कारणांनी अपघात होत आहेत.
- वाहतूकीच्या नियमांचे पालन आवश्यक
रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बहुतांश अपघात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होतात.तसेच घाटात व वळणावर वाहने सावकाश चालवावीत.
गणेश डगळे– सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
- वाहन चालकाचे कर्तव्य
वाहनाची दैनंदिन देखभाल करणे
वाहनांच्या डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करणे
वाहनाची इंधन गळती,ब्रेक कार्यक्षमता,टायर्सची स्थिती नियमित तपासावी
योग्य लेनमधूनच प्रवास करावा
- घाटात घ्यावयाची खबरदारी
वाहन खालच्या गिअरमध्ये चालवणे
घाट चढताना ज्या गिअरमध्ये वाहन चालवले जाते त्याच गिअरमध्ये उतरणे
घाट चढणाऱ्या वाहनांना प्राधान्य
घाटात वाहन थांबवणे गरजेचे असल्यास वाहन रस्त्यावर उभे केल्यावर वाहतूकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे








