वास्को-यशवंतपूर एक्स्प्रेसचा डबा शनिवारी मध्यरात्री घसरला
बेळगाव : वास्को-यशवंतपूर एक्स्प्रेसचा एक डबा शनिवारी मध्यरात्री रूळावरून घसरल्याची घटना करंजोळ ते कॅसलरॉक दरम्यान घडली. यामुळे लोंढा-वास्को या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांना मात्र तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. सध्या पश्चिम घाटामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. विशेषत: लोंढा ते दूधसागर दरम्यानच्या रेल्वेमार्गावर पावसाचा जोर अधिक असल्यामुळे वरचेवर अपघात होत असतात. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वास्को-यशवंतपूर एक्स्प्रेसचा एक डबा रूळावरून खाली घसरला. त्यामुळे या रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम जाणवला. वास्को-शालिमार एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावली. तर हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस लोंढा रेल्वेस्थानकात थांबविली होती. ताबडतोब या ठिकाणी रेल्वेडबा रूळावर आणण्यासाठी काम सुरू करण्यात आले. जनरल मॅनेजर, अॅडिशनल जनरल मॅनेजर तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास रेल्वेचा डबा बाजूला करण्यात आला. मार्ग खुला झाल्यानंतर सुरुवातीला चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रेल्वेवाहतूक सुरू झाली.
रेल्वेकडून प्रवाशांची सोय
बेळगावहून वास्कोच्या दिशेने गेलेली गोवा एक्स्प्रेस मध्यरात्री लोंढा रेल्वेस्थानकात थांबविण्यात आली. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही तास एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने एक हजाराहून अधिक प्रवाशांसाठी नाश्ता, चहा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.









