लोणावळा : आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोणावळा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. सकाळपासून मोठय़ा प्रमाणात लोणावळय़ात पर्यटक दाखल झाले होते.
भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी कोंडी निर्माण झाली होती. सहारा पुलापासून पुढे पायी पर्यटकांच्या अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. लोणावळा शहर व परिसरामध्ये या शनिवार व रविवारी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तसेच होमगार्ड वाहतूक वॉर्डन व स्वयंसेवक असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता.
रस्त्यावर वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र, वाहनांची संख्या प्रचंड असल्याने रस्त्यावर सर्वत्र वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या. सहारा पुल धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉईंट, खंडाळा राजमाची गार्डन, अमृतांजन पुलाजवळील डय़ुक्स नोज पॉईट या लोणावळा शहरातील पर्यटन स्थळांसह ग्रामीण भागामधील कार्ला लेणी, भाजे लेणी व भाजे धबधबा लोहगड किल्ला, पवना धरणाचा परिसर या सर्व भागांमध्ये पर्यटकांची गर्दी पहायला मिळत होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. पी ए सिस्टीमच्या माध्यमातून वाहन चालकांना व पर्यटकांना सूचनांचा भडिमार सुरू होता. तरी देखील काही बेशिस्त पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावरच वाहने थांबवत वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते. अशा शेकडो वाहनांवर शनिवार व रविवारी पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.