प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सभासदांना आरोग्य सुविधांमध्ये सवलत देण्याच्या हेतूने लोकमान्य सोसायटीने रानडे रोड, टिळकवाडी येथे असणाऱ्या सेंट्रा केअर हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार सभासदांना ठरावीक आरोग्य सेवांवर 10 टक्के सवलत मिळणार आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वपूर्ण कराराचे हस्तांतरण एका कार्यक्रमात करण्यात आले. सोसायटीच्यावतीने सीईओ अभिजित दीक्षित व सेंट्रा केअर हॉस्पिटलतर्फे डॉ. नीता देशपांडे यांनी करारावर सह्या केल्या. सध्याच्या काळात आरोग्य सेवा अधिक किफायतशीर बनविण्याच्यादृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार आहे. सोसायटीच्या सभासदांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटलशी संपर्क साधावा व सोसायटीचे सभासदपत्र किंवा ठेव पावती सोबत नेणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, मुख्य सुरक्षा अधिकारी निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, सेंट्रा केअर हॉस्पिटलचे संचालक रोहित देशपांडे व दीपक करंजीकर उपस्थित होते.









