लोकमान्यच्या शाखांमध्ये विमा कंपनीच्या सर्व सुविधा-योजना मिळणार
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सर्व ग्राहकांना जीवन विम्यासह (लाईफ इन्शुरन्स) विम्याच्या इतर सुविधा व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘लोकमान्य सोसायटी व रिलायन्स निप्पॉन’ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत लोकमान्यच्या शाखांमध्ये रिलायन्स निप्पॉन या विमा कंपनीच्या सर्व सुविधा व योजना उपलब्ध होणार आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित व रिलायन्स निप्पॉन इन्शुरन्सचे नॅशनल हेड अमित चोप्रा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी निप्पॉनचे प्रमुख व्यवस्थापक विशाल काटे, साहाय्यक व्यवस्थापक अनिकेत कुरणे, लोकमान्यच्या विमा विभागाचे प्रमुख राहुल पाटील उपस्थित होते.
या करारामुळे रिलायन्स निप्पॉनच्या सर्व सुविधा व उत्पादने लोकमान्य सोसायटीच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहेत. जीवन विमा व इतर विम्याचे विविध पर्याय ग्राहकाला मिळणार आहेत. लोकमान्य सोसायटीने खातेदारांचा विश्वास संपादन करत त्यांना योग्य सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. आता या करारामुळे लोकमान्यतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये अधिक भर पडली आहे. कर्नाटकातील सर्व शाखांमध्ये रिलायन्स निप्पॉनच्या विमा सुविधा उपलब्ध असून खातेदारांना या सेवेचा लाभ घेता येईल, असे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित यांनी कळविले आहे.









