बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट) च्या मराठी भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने दि. 1 मे पासून ‘चला मजे मजेत शिकूया मराठी’ हा उपक्रम सुरू होत आहे. या अंतर्गत मुलांना प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि कोविद हे मराठी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुलांना मातृभाषेची ओळख व्हावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांची आकलन क्षमता वाढावी या हेतूने डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा शिकविण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात आज मराठी कुटुंबातील मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ती आपल्या मातृभाषेपासून वंचित रहात आहेत. ही खेदाची बाब काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठीसुद्धा तो पूरक ठरणार आहे. मुले खऱ्या अर्थाने सक्षम व सुसंस्कारीत होण्यासाठी मातृभाषेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे जागतिक पातळीवरील भाषातज्ञ सांगत आहेत.
जगातील कोणतीही अन्य परकीय भाषा सहजतेने आत्मसात करण्यासाठीसुद्धा मातृभाषा साहाय्यभूत ठरत असते. मराठी पालकांनी मुलांना या संधीचा फायदा घेऊ द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्या कोणाला मराठी भाषा शिकण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येईल. लोकमान्य बालग्रंथालय, लोकमान्य बँक इमारत, पहिला मजला, आरपीडी कॉलेज आवार, टिळकवाडी-बेळगाव येथे हे वर्ग होतील. अधिक माहितीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 7090340672, 8660686261 किंवा 8951069652 या क्रमांकावर संपर्क साधावा.









