मोनोकडून हुसेनवर घिसा डावावर विजय, शिवराज राक्षेचा गुरुप्रितवर निकालवर प्रेक्षणीय विजय, चटकदार निकालामुळे कुस्ती शौकिनांचे पारणे फिटले
उमेश मजुकर / बेळगाव
यळ्ळूर येथे कलमेश्वर, चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवस व यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात दिल्लीच्या मोनो खुराणाने इराणच्या हुसेनचा अवघ्या दहा मिनिटात पाय लावून घिसा डावावर तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने गुरुप्रित सिंग याला अवघ्या दोन मिनिटात बकरी पछाड मारून निकाल डावावरती नेत्रदीपक विजय मिळवित उपस्थित 50 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

प्रमुख लोकमान्य केसरीसाठी प्रमुख कुस्ती भारत केसरी, हिंद केसरी, महान भारत केसरी पदक विजेता मोनो खुराना दिल्ली व ऑलिम्पिक पदक विजेता हुसेन इराण ही कुस्ती लोकमान्य सोसायटीच्या संचालक गजानन धामणेकर, माजी नगरसेवक पंढरी परब, सुबोध गावडे, कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, आनंद आकणोजी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी व येळ्ळूर कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्ती पहिल्याच मिनिटात मोनो खुराणाने एकेरी पट काढून हुसेनवर ताबा मिळवून घिशावर फिरवण्याचा प्रयत्न केला. यातून हुसेनने सुटका करून घेतली पण लागलीच मोनोने दुहेरी पट काढून हुसेनला खाली घेत मानेचा कस काढीत घुटण्यावरती फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हुसेनने सुटका करून घेतली. सहाव्या मिनिटाला मोनोने एकेरी पट काढून पायाला अकडी लावत हफ्त्यावरती फिरवण्याचा प्रयत्न केला पण त्यातून सावरले. व खालून डंकी मारून हुसेनने मोनोवर ताबा मिळवत मोळी बांधण्याचा प्रयत्न केला पण अनुभवी मोनोने सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला मोनोने एकेरी पट काढून हुसेनला खाली घेत घिसावरती फिरवण्याचा प्रयत्न केला. दहाव्या मिनिटाला मोनोने दुहेरी पट काढीत हुसेनला खाली घेत पाय लावून घिसावर हुसेनला आसमान दाखवत नेत्रदीपक विजय मिळवला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते विद्यमान महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राचा अस्सल मल्ल शिवराज राक्षे व भारत केसरी दिल्लीचा गुरुप्रित सिंग यांच्यात लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला शिवराज राक्षेने एकेरी पट काढत गुरुप्रितवर ताबा मिळवत पोकळ घिशावरती फिरवण्याचा प्रयत्न केला. पण लागलीच शिवराज राक्षेने बकरी पिछाड मारून निकाल डावावरती अवघ्या दोन मिनिटात चित करून उपस्थित 50 हजार हून अधिक कुस्ती शौकिनांची डोळ्याचे पारणे फेडली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती ज्युनिअर भारत केसरी हरियाणाचा विशाल भोंडू व इराणचा मोहरीन ही कुस्ती माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, उद्योजक आनंद आकणोजी, बिल्डर व डेव्हलपर प्रमोद पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्ती पहिल्याच मिनिटाला विशाल भोंडूने एकेरी पट काढत इराणच्या मोहरीनला खाली घेत घिसा मारण्याचा प्रयत्न करीत असताना निकाली डावावरती अवघ्या दीड मिनिटात मोहरीनला चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला मारलेला प्रकाश बनकर व हरियाणा चॅम्पियन्स रोहिल हरियाणा ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्ती दुसऱ्या मिनिटाला प्रकाश बनकरने दुहेरी पट काढून रोहिल नागरला खाली घेतले व झोळी बांधून चित करण्याचा प्रयत्न केला. पण रोहिलने त्यातून सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला प्रकाश बनकरने एकेरी पट काढून रोहिलवर ताबा मिळवून निकाल डावावरती विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व भारत केसरी दिल्लीचा लक्ष्मण डागर यांच्यात लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला लक्ष्मण डागरने दुहेरी पट काढून कार्तिकवर ताबा मिळवला. व घुटण्यावर चित करण्याचा प्रयत्न केला पण सावध कार्तिकने त्यातून सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला कार्तिकने पायाला आकडी लावत लक्ष्मणला खाली घेतले. व पायाला एकलांगी भरून एकलांगी डावावरती चित करून आपली विजयी घौडदोड कायम राखली आहे. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे व कर्नाटक केसरी व मुंबई महापौर केसरी सुनील फडतरे यांच्यात लावण्यात आली. नवव्या मिनिटाला सुनील फडतरेने संदीप मोटेला बॅकथ्रो मारला त्यातून सावध होऊन संदीप मोटेने मानेवर घुटणा ठेवून फिरवताना सुनील फडतरेला गंभीर दुखापत झाल्यामुळे संदीप मोटेला विजयी घोषित करण्यात आले.

सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुबोध पाटील सांगलीने निर्मल देसवाल पानिपत याचा गदेलोट डावावर विजय मिळवला. आठव्या क्रमांकाच्या कुस्ती संगमेश बिराजदार व उमेश चव्हाण ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. नवव्या क्रमांकाच्या कुस्ती बंटीकुमार उत्तर प्रदेशला प्रशांत शिंदे सांगली याला दुखापत झाल्याने बंटीकुमारला विजयी घोषित करण्यात आले. नवव्या क्रमांकाच्या कुस्ती कर्नाटक चॅम्पियन शिवा दंडीने उदय खांडेकर वारणा याचा एकचाक डावावर विजय मिळवला.
निखिल गणेशपूरने शरद पवार सांगलीचा घुटण्यावर, प्रकाश इंगळगीने संग्राम सुर्यवंशी साताऱ्याचा डंकीवर, रोहित पाटील कंग्राळीने मंगेश बेलेचा एकचाकवर, निरंजन कर्लेकर येळ्ळूरने गौस दर्गाचा घुटण्यावर, किर्तीकुमार कार्वेने बाळू घोटगेरीचा एक चाक डावावरती, बबलू सुतार कोल्हापूरने गुडाप्पा दावणगेरीचा एकचाक डावावरती, पवन चिकदीनकोपने दिक्षीत म्हैसूरचा घिशावर, विक्रम शेनोळीने इंद्रजित मोळेचा एकचाकवर, हनुमंत गंदिगवाडने सुमित भोंडू हरियाणाचा एकलांगीवर पराभव करून विजय मिळवला. त्याचप्रमाणे सुशांत कंग्राळी, पंकज चापगाव, प्रेम जाधव कंग्राळी, कामेश पाटील कंग्राळी, पार्थ पाटील कंग्राळी, कार्तिक इंगळगी, विनायक बेकवाड, राजू शिनोळी, सुरज कडोली, शुभम कंग्राळी, रुपेश कर्ले, कुणाल येळ्ळूर, शंकर तिर्थकुंडये, राजू कोळी यळगुड, सिद्धार्थ तिर्थकुंडये, महांतेश संतीबस्तवाड, साहिल कांबळे, शंकर तिर्थकुंडये, धीरज येळ्ळूर, श्रीनाथ गुरव बेळगुंदी, सुमित वडगाव, तुकाराम किणये, ओमकार कडोली, गणेश आवरे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नेत्रदीपक विजय मिळवले. आकर्षक कुस्तीत केशव गंगावेसने रोहन हल्dयाळचा डंकी डावावर, हर्षद शिनोळीने ओमकार सांगलीचा एकचाकवरती, निखील माने सांगलीने सत्यजित बुदिहाळचा छडी टांगवर पराभव करून विजय मिळवला. मेंढ्याच्या कुस्तीत मंथन सांबराने ओमकार खादरवाडीचा झोळी डावावरती पराभव करून मेंढ्याचे बक्षीस पटकावले. कुस्तीसाठी पंच म्हणून हनुमंत गुरव, दौलत कुगजी, सुधीर बिर्जे, निवृत्त युवजन क्रीडा अधिकारी विलास घाडी, बाळाराम पाटील, कृष्णा पाटील कंग्राळी, गणपत बन्नोसी, शिवाजी पाटील कडोली, विश्वनाथ पाटील, नवीन मुतगे, पिराजी मुचंडीकर, नाना कोल्हापूर, राजू कडोली, जोतिबा हुंदरे, अभिजित पाटील व येळ्ळूर गावातील ज्येष्ठ मल्लांनी पंच म्हणून काम पाहिले.

प्रारंभी आखाड्याचे उद्घाटन आनंद आकणोजी व माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येळ्ळूर मैदानाचे शिल्पकार कै. दत्ताकर हट्टीकर, पै. मारुती कुगजी व सोमनाथ पाखरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुस्तीचे समालोचक कृष्णा चौगुले राशिवडे व ज्योतिराम वाजे सांगली यांनी केले. तर कुरुंदवाडचे माजी नगरसेवक हलगी सम्राट, राजू आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.
किरण ठाकुर यांनी ‘लोकमान्य’च्या कुस्तीची परंपरा जोपासण्याचे कार्य केले आहे
सलग 15 वर्षे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे महाराष्ट्र मैदान येळ्ळूर मैदानाला भरीव देणगी देत मैदानाला उचलून धरले आहे. भारतीय कुस्ती कुस्ती परंपरा जोपासण्यासाठी मोलाचे सहकार्य संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले आहे. त्यामुळे आज हे मैदान संपूर्ण भारतात प्रतिष्ठेचे बनले आहे. या मैदानात संपूर्ण देशातून अव्वल मल्लांना प्राधान्य दिले जाते. गेली काही वर्षे हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले आहे. इराण व तुर्की येथून मल्लांनी महाराष्ट्र मैदानात पाय लावले आहे.









