चंद्रकांत शहासने यांची मूळ संकल्पना : 15-19 ऑगस्टदरम्यान मराठा मंदिरात आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 15 ते 19 ऑगस्टदरम्यान मराठा मंदिर येथे तसेच 4 सप्टेंबरपर्यंत विविध शाळा आणि ग्रंथालयांमध्ये भरविण्यात येणार आहे. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे 948 दिवसांचा ‘ओळख देशभक्तांची-शाळा तेथे क्रांतिमंदिर’ हा उपक्रम राबवत आहे. याची मूळ संकल्पना संस्थेचे विश्वस्त देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांची आहे. याद्वारे शहासने यांच्या संकल्पनेतून साकारलेले 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाळा-शाळांमधून प्रदर्शित करण्यात येते. यात हे प्रदर्शन आणि दहा हजार क्रांतिकारांची माहिती असलेला देशभक्त कोश आणि संस्थेचे इतर देशभक्तीपर साहित्य डिजिटल स्वरुपात संस्थेस व संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत सुपूर्द करण्यात येते.
सदर प्रदर्शन महाराष्ट्रातील 358 तालुक्यातील शाळांसह कर्नाटकात बेळगाव, खानापूर, जांबोटी, कणकुंबी आणि गोवा राज्यातील शाळांमधून हा उपक्रम 26 जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने बेळगाव येथे हे प्रदर्शन मराठा मंदिरमध्ये 15 ते 19 ऑगस्ट, आरपीडी महाविद्यालय किड्स लायब्ररीमध्ये 20 आणि 21 ऑगस्ट, ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये 22 आणि 23 ऑगस्ट, व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक खानापूर येथे 25 व 26 ऑगस्ट, सोमवार पेठ, गणेश मंडळ येथे 28 व 30
ऑगस्ट, बाबुराव ठाकुर पीयु कॉलेज जांबोटीमध्ये 1 आणि 2 सप्टेंबर आणि कणकुंबी हायस्कूल, कणकुंबी येथे 3 आणि 4 सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. 14 जून 2023 पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. आजपर्यंत सोलापूर, धाराशिव, उदगीर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, विदर्भ, रायगड, पुणे, कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक शाळांतून लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व जनतेने या उपक्रमास भेट देऊन संस्थेचे कौतुक केलेले आहे. सदरील उपक्रम हा पूर्णत: लोकाश्रयाने कार्यान्वित असून संस्थेला शासकीय अनुदान नाही. डॉ. किरण ठाकुर यांनी पुढाकार घेऊन प्रदर्शनासाठी खास टेम्पो ट्रॅव्हलर दिला आहे. बेळगाव शहरातील सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या अनोख्या व अभ्यासपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.









