प्रतिनिधी /पणजी
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत बिल्वदल परिवार आयोजित सवेष नाटय़गीत गायन स्पर्धेसाठीची निवड चाचणी आज शनिवार दि. 30 जुलै रोजी पणजीत होणार आहे.
या स्पर्धेसाठी सुमारे 1 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. मुख्य तथा अंतिम स्पर्धा रविवार दि. 14 ऑगस्ट रोजी रवींद्र भवन सांखळी येथे होणार असून आज दुपारी 3 वा.पासून पणजीत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात प्रवेश चाचणीला प्रारंभ होईल.
सहभागी कलाकारांना कोणतीही 3 नाटय़गीते तयार करण्यास सांगितले होते. त्यातील कलाकारांनी त्यांच्या पसंतीचे एक नाटय़गीत आज दुपारी सादर करायचे आहे. ही केवळ प्राथमिक चाचणी असल्याने नाटय़गीतापूर्वी नाटकातील संवाद वा नाटय़क्षेत्रातील वेशभूषा सादर करण्याची अट घालण्यात आलेली नाही. नेहमीच्या वेशात गाणे सादर करायचे आहे. यावेळी परीक्षक कलाकारांना मार्गदर्शनही करतील.
ज्यांनी स्पर्धेसाठी अर्ज सादर केलेले आहेत त्या सर्व कलाकारांनी दुपारी 2.45 पर्यंत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात हजर राहून तिथे उपस्थित असलेले शंकर जाधव यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी (9011036445) या क्रमांकाशी संपर्क साधावा. कलाकारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दुपारी 3 वा. उद्घाटन समारंभ होईल व लागलीच स्पर्धेला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा व रवींद्र भवन सांखळी यांचेही सहकार्य लाभले आहे.









