यंदाचे 15 वर्ष, युनियन जिमखान्यावर रंगणार सामने
बेळगाव : लोकमान्य व तरुण भारत मर्यादित क्रिकेट स्पर्धा ‘लोकमान्य प्रिमियर लीग’ येत्या 23 ते 25 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये बेळगावसह गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे व नाशिक येथील खेळाडू सहभागी होणार आहेत. यावर्षीचे स्पर्धेचे 15 वे वर्ष असून बेळगावच्या क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या युनियन जिमखाना मैदानावर क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणारे क्रिकेटपटू आपापल्या विभागांमध्ये सध्या तयारीला लागले आहेत. कार्यालयीन कामकाजाबरोबरच कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा, यासाठी मागील चौदा वर्षांपासून लोकमान्य प्रिमियर लीगचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुण भारत परिवारातील सदस्य सहभागी होत असतात. बुधवारी लोकमान्य रंगमंदिर येथे लोकमान्य प्रिमियर लीगच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, सीएफओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, असिस्टंट जनरल मॅनेजर सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी विविध संघांचे कप्तान सहभागी झाले होते.









