वैद्यकीय सेवेसह हॉस्पिटलमधील कामकाजाची घेतली माहिती
बेळगाव : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बिम्सला भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवेची पाहणी केली. बेंगळूर येथील लोकायुक्तांच्या सूचनेवरून इस्पितळात पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकायुक्तांच्या या भेटीमुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय, पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्यासह सहाहून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने बुधवार दि. 5 मार्च रोजी दुपारी बिम्सला भेट दिली. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांच्याबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटून येथील कामकाजाची माहिती घेण्यात आली.
खासकरून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील सुपरस्पेशालिटी इस्पितळाचीही पाहणी केली. 1 मार्चपासून सुपरस्पेशालिटी विभागात पॅथॉलॉजी लॅब सुरू झाले आहे. इतर विभाग सुरू होण्यास आणखी किमान एक महिन्याचा तरी कालावधी लागणार आहे, अशी माहिती बिम्समधील अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांना दिली. महिन्यातून किमान एकदा तरी सरकारी इस्पितळांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्याची सूचना लोकायुक्तांनी केली आहे. त्यामुळे बुधवारी सहाहून अधिक अधिकाऱ्यांसह वीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील काही विभागात कागदपत्रांचीही पडताळणी केली. अलीकडे बाळंतिणींच्या मृत्यू प्रमाणात वाढ झाली आहे. यासंबंधीही अधिकाऱ्यांनी बिम्स प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.









