बेळगावसह सात जिल्ह्यांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर 33 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे
प्रतिनिधी/ बेळगाव, बेंगळूर
बेळगावसह राज्यातील सात जिल्ह्यांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांनी शनिवारी सकाळी एकाचवेळी छापे टाकले आहेत. सुवर्णविधानसौधमध्ये कार्यालय असलेल्या देवराज अरस मागासवर्गीय विकास निगमचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धलिंगप्पा निंगाप्पा बनाशी यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत एक कोटी रुपयांहून अधिक घबाड उघडकीस आले आहे. बेळगाव, बागलकोट, धारवाड, बळ्ळारी, गदग, हावेरी आणि उडुपी या जिल्ह्यांमध्ये 33 हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रारी दाखल झाल्याने लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरत रे•ाr, पुष्पलता, पोलीस निरीक्षक वेंकटेश यडहळ्ळी, रवीकुमार धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यानगर-बेळगाव येथील सिद्धलिंगाप्पा यांचे घर, बेक्केरी, ता. रायबाग येथील घर व सुवर्णविधानसौधमधील कार्यालयावर एकाचवेळी छापे टाकले. सिद्धलिंगाप्पा यांच्यासंबंधी कार्यालय व घरासह तीन ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार 37 लाख 66 हजार रुपये किमतीचे चार भूखंड, 65 लाख रुपये किमतीचे घर, 18 हजार 260 रुपये रोकड, 34 लाख 64 हजार 691 रुपये किमतीचे दागिने, 10 लाख 60 हजार रुपये किमतीची वाहने, 1 कोटी 8 लाख 33 हजार 951 रुपयांची माया त्यांनी जमवल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. सायंकाळनंतरही तपासणी सुरूच होती.
दरम्यान, धारवाड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते एच. सी. सुरेश व गदग निर्मिती केंद्राचे गंगाधर शिरोळ यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवरया दोन्ही अधिकाऱ्यांच्या हनुमाननगर येथील निवासस्थानावर तपासणी करण्यात आली आहे. धारवाड व गदग जिल्ह्यातील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
एच. सी. सुरेश यांच्याजवळ 3.31 कोटींचे घबाड
धारवाड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे (उत्तर विभाग) मुख्य अभियंते एच. सी. सुरेश यांच्याजवळ 3.31 कोटींचे घबाड आढळले आहे. त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. धारवाडच्या केडीसी सर्कलजवळील पीडब्ल्यूडीचे शासकीय वसतीगृह आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कार्यालयातही लोकायुक्त पथकाने तपासणी केली. गदग व बेळगावमध्येही तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळ 2 भूखंड, 2 बंगले, 6 व्यापारी संकूल, 11.35 एकर शेतजमीन आढळली आहे. याचे मूल्य 2,89,36,528 रु. इतके आहे. त्यांच्याजवळ 254 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2.5 किलो चांदी, दोन कार, 25 लाख रु. किमतीच्या महागड्या वस्तू आढळल्याचे समजते.
बागलकोटमध्ये ऑडिट अधिकाऱ्याला दणका
बागलकोटमधील प्र. द. स. ऑडिट कार्यालयातील अधिकारी श्रीशैल तत्रानी यांच्याशी संबंधित 4 ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळ एकूण 2.93 कोटींचे घबाड आढळले. 3 भूखंड, 6 निवासस्थाने, 6.34 एकर शेतजमीन आढळली आहे. याचे मूल्य 2.27 कोटी रु. होते. त्याचेप्रमाणे 21.01 कोटींचे सोन्याचे दागिने, 45.60 लाखांची वाहने आढळली आहेत.
पीडीओजवळ मोठे घबाड
हावेरीच्या शिग्गाव तालुक्यातील बाड ग्रामपंचायत पीडीओ रामकृष्ण बी. गुडगेरी यांचे निवासस्थान व कार्यालयावर धाड टाकण्यात आली. त्यांच्याजवळ उत्पन्नापेक्षा 138 टक्के अधिक बेकायदा मालमत्ता आढळली आहे. त्यांच्याजवळ 79,500 रु. रोकड, 8.53 लाखांचे दागिने तसेच हुबळी-धारवाडमध्ये दोन भूखंड यासह 86.15 लाखांची स्थावर मालमत्ता आढळली आहे.
गदगमधील अधिकाऱ्यावर 7 ठिकाणी छापे
गदगमधील निर्मिती केंद्राचे योजना संचालक गंगाधर शिरोळ यांचे निवासस्थान, कार्यालयासह 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यांच्याजवळ चार भूखंड, स्वत:च्या नावे दोन आणि पाच बेनामी बंगले आढळले आहेत. त्यांच्याजवळ 3.39 एकर शेतजमीन, 21.50 लाखांची रोकड, 23.83 लाखांचे 307 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3.70 लाखांची चांदी, इनोव्हा कार, दोन दुचाकी आढळल्या आहेत.
उडुपी जिल्ह्यातील कारकळ येथील मंगळूर वीजपुरवठा निगमचे (मेस्कॉम) लेखा अधिकारी गिरीश राव यांनी 2.89 कोटींची माया जमविल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी झडती घेण्यात आली. यावेळी 2.68 कोटी रु. किमतीचे 4 भूखंड, 7 निवासस्थाने, 3.29 एकर शेतजमीन आढळली आहे. तसेच 25 हजारांची रोकड, 27.53 लाखांचे सोन्याची दागिने, 17.30 लाखांची वाहने, 21.25 लाखांचे बँक बॅलन्स असे एकूण 66.33 कोटींची जंगम मालमत्ताही आढळली आहे.
बळ्ळारीतील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधीक्षक अभियंता अमीन मुक्तार यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळ एकूण 7.32 कोटींचे घबाड आढळले आहे.
धाडी पडलेले अधिकारी
सिद्धलिंगप्पा बनासी-डी. देवराज अरस मागासवर्ग विकास निगम, जिल्हा व्यवस्थापक बेळगाव
एच. सी. सुरेश-मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते (उत्तर विभाग) धारवाड
श्रीशैल तत्रानी- प्र. द. स. ऑडिट ऑफीस, बागलकोट
गंगाधर शिरोळ-निर्मिती केंद्र, योजना संचालक गदग
रामकृष्ण गुडगेरी-पीडीओ, ग्रा. पं. बाड, हावेरी
गिरीश राव-लेखा अधिकारी, मेस्कॉम, उडुपी
अमीन मुक्तार-अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते बळ्ळारी









